‘आमदारांच्या दबावामुळे वीज जोडणी नाकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:48 IST2017-12-20T00:48:24+5:302017-12-20T00:48:33+5:30
नियमानुसार वारसा हक्क असतानाही साठे चौकातील रवींद्र सोनाजीराव क्षीरसागर यांच्या मालकीच्या स्टेशनरी दुकानाला वीज जोडणी देण्यास टाळाटाळ करणाºया अधीक्षक अभियंत्यांना संदीप क्षीरसागर, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी चांगलेच धारेवर धरले.

‘आमदारांच्या दबावामुळे वीज जोडणी नाकारली
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : नियमानुसार वारसा हक्क असतानाही साठे चौकातील रवींद्र सोनाजीराव क्षीरसागर यांच्या मालकीच्या स्टेशनरी दुकानाला वीज जोडणी देण्यास टाळाटाळ करणा-या अधीक्षक अभियंत्यांना संदीप क्षीरसागर, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी चांगलेच धारेवर धरले.
उर्जामंत्री बावणकुळे, आ.जयदत्त क्षीरसागर यांचे फोन येत असल्यामुळे आपण वीज जोडणी देऊ शकत नाही, असे अभियंत्यांनी आपल्याला सांगितल्याचे हेमंत क्षीरसागर म्हणाले. आमदार क्षीरसागर प्रत्येक कामात खोडा घालत असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला. दुपारनंतर वीज जोडणी देण्यात आली.
रवींद्र क्षीरसागर यांनी महावितरणकडे नवीन वीज जोडणीसंदर्भात अर्ज केला होता. परंतु जोडणी देण्यास अभियंता टाळाटाळ करीत होते. आ.जयदत्त क्षीरसागर यांनी अभियंत्यांना पत्र दिले. तसेच उर्जामंत्र्यांकडून अभियंत्यांवर दबाव आणत खोडा घालण्याचे काम आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले, असा आरोप उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी केला.
आमदरांच्या दबावाला बळी पडल्यानेच वीज जोडणी दिली जात नव्हती, असेही उपनगराध्यक्ष म्हणाले. त्यानंतर जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर यांनी नियम दाखविताच अभियंत्यांनी वीज जोडणी दिल्याचे सांगितले. दरम्यान, आमदारांच्या दबावाला बळी पडून वीज कनेक्शन नाकारणा-या अधीक्षक अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संदीप क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अमर नाईकवाडे यांनी केली आहे.
नियमानुसारच काम केले
वीज जोडणीसंदर्भात आपण मार्गदर्शन मागितले होते. नियमात आहे, असे समजताच वीज जोडणी दिली. आपण नियमानुसारच काम केले.
- अजिनाथ सोनवणे,
अधीक्षक अभियंता, महावितरण