धारूर बाजार समितीच्या सभापतीची आज निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST2021-07-12T04:22:00+5:302021-07-12T04:22:00+5:30
धारूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या पदावर आगामी आठ महिन्यांसाठी कारभारी निवडला जात आहे. यासाठी ...

धारूर बाजार समितीच्या सभापतीची आज निवड
धारूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या पदावर आगामी आठ महिन्यांसाठी कारभारी निवडला जात आहे. यासाठी १२ जुलै रोजी बैठक होत आहे. भाजपाचे बहुमत असलेल्या बाजार समितीमध्ये सभापती पदासाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने फोडाफोडीचा दगाफटका टाळण्यासाठी भाजपाचे संचालक दोन गटात सहलीवर पाठवले आहेत. सभापती पदासाठी विविध नावे चर्चेत असली तरी विद्यमान उपसभापती सुनील शिनगारे व माजी उपसभापती महादेव तोंडे यांची नावे चर्चेत आघाडीवर आहेत. मात्र, ऐनवेळी नेमकी कोणाची वर्णी लागणार, की तिसरेच नाव पुढे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक नऊ महिन्यांवर आली आहे. विद्यमान संचालक मंडळाची मुदत १७ एप्रिल २०२२ रोजी संपते. मात्र, येथील सभापती महादेव बडे यांच्या निधनामुळे येथील सभापती पद रिक्त झाले. आठ महिन्यांच्या कार्यकाळासाठी सभापतीची निवड होत असून, संचालकांची बैठक बोलवण्यात आली आहे.
भाजपाचे बहुमत असलेल्या बाजार समितीत भाजपाचे दहा, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सात संचालक आहेत. भाजपाच्या ताब्यात ही संस्था आहे. भाजपाचे रमेशराव आडसकर व राजाभाऊ मुंडे यांना मानणारे संचालक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपाच्या संचालकांत दुफळी होण्यासाठी लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी आपापले संचालक चार दिवसांपूर्वी सहलीवर पाठवले आहेत. सभापती पदासाठी भाजपाकडून उपसभापती सुनील शिनगारे, माजी उपसभापती महादेव तोंडे, बालासाहेब जाधव व ॲड. नवनाथ पांचाळ यांची नावे चर्चेत आहेत. यात सुनील शिनगारे व महादेव तोंडे यांची नावे आघाडीवर घेतली जात आहेत. त्यामुळे या दोघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सोमवारी होणाऱ्या सभापती पदाच्या या निवडीत ऐन वेळी काही राजकारण घडून तिसरेच नाव समोर येते की काय, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.