- सोमनाथ खताळबीड : जिल्हा रुग्णालयातील अनागोंदी कारभार आता कळसाला पोहोचला आहे. बुधवारी एका वृद्ध महिलेला सोनोग्राफीसाठी दुसऱ्या मजल्यावरून झोळी करून खाली आणले असतानाही, ‘वेळ संपली’ असे सांगून कर्मचाऱ्यांनी तपासणी नाकारली. ५:५५ वाजताच विभागाला कुलूप लावून कर्मचारी पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आरोग्य विभागाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट गेल्या पाच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या वृद्ध महिलेला वरच्या मजल्यावरून खाली आणण्यासाठी नातेवाइकांना मोठी कसरत करावी लागली. झोळी करून पायऱ्यांवरून त्यांना खाली आणले गेले. मात्र, एवढ्या कष्टाने खाली पोहोचल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी किमान माणुसकी न दाखवता विभागाचे दरवाजे बंद केले. त्यामुळे या वृद्ध महिलेची तपासणी होऊ शकली नाही.
वेळेचे बंधन कागदावरच!जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नियमानुसार, बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी ९ ते १ आणि दुपारी ४ ते ६ अशी आहे. प्रत्यक्षात मात्र वेळेपूर्वीच डॉक्टर आणि कर्मचारी गायब होत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. ‘लोकमत’ने दोन दिवसांपूर्वीच स्टिंग ऑपरेशन करून हा प्रकार चव्हाट्यावर आणला होता, तरीही प्रशासनाने यातून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. त्यामुळेच अशा प्रकारांमध्ये वाढ होत आहे.
वेळेआधीच गायब कसे, अभय कोणाचे?रुग्णालयातील रोजच्या नियोजनाची जबाबदारी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक (एसीएस) यांच्यावर असते. मात्र, कर्मचारी वेळेआधीच कसे काय निघून जातात, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या कर्मचाऱ्यांना छुपे अभय असल्याचा आरोप आता रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक करीत आहेत. विशेष म्हणजे, या गंभीर परिस्थितीवर बीडमधील लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढारी गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
परिचारिकेची बदली; डॉक्टरला पाठबळ?कुलूप लावणाऱ्या एका गर्भवती परिचारिकेची सोनोग्राफी विभागातून तडकाफडकी बदली करण्यात आली. परंतु, याच विभागातील डॉक्टरांवर गुरुवारी दुपारपर्यंत कसलीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. वेळेआधीच डॉक्टर निघून गेलेले असतानाही त्यांना अभय कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. यावरून डॉक्टरांना वेगळा आणि कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय दिला जातोय, अशी चर्चा रुग्णालय परिसरात सुरू आहे. जर डॉक्टर हजर असते तर परिचारीका गेल्याच नसत्या. परिचारीकेआधी डॉक्टरच दोषी असल्याचा सूर उमटत आहे.
म्हणे, ४:३० पर्यंतच रुग्ण पाठवा!हा सर्व प्रकार घडल्यानंतर डॉ. साळुंके यांना उशिरा जाग आली. त्यांनी गुरुवारी सर्व प्रमुखांना (इन्चार्ज) पत्र काढले आहे. “वॉर्डातील रुग्णांना एक्स-रे, सोनोग्राफी, सीटीस्कॅन तपासणीसाठी दुपारी ४:३० वाजेपर्यंतच पाठवावे,” असा लेखी आदेश त्यांनी काढला आहे. हा आदेश रुग्णांसाठी लाभदायक ठरणार की त्रासदायक, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.
रुग्ण वाऱ्यावर; मदतीसाठी कोणीच नाही!जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्याने रुग्णांना पायऱ्यांवरून नेण्यासाठी नातेवाइकांना संघर्ष करावा लागत आहे. नियमानुसार कक्षसेवकांनी मदत करणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात रुग्ण वाऱ्यावर सोडले आहेत. बुधवारी वृद्ध महिलेला झोळीतून नेताना एकही कर्मचारी मदतीला धावला नाही. रुग्णालय प्रशासनाच्या या अमानवीय आणि ढिम्म कारभारामुळे सर्वसामान्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; कामचुकारांचे फावले!जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्याचे मुख्य आरोग्य केंद्र असून, येथे दररोज हजाराहून अधिक रुग्णांची वर्दळ असते. मात्र, सध्या सुरू असलेल्या गलथान कारभाराकडे खासदार आणि आमदारांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. लोकप्रतिनिधींचा वचक नसल्यानेच अधिकारी आणि कामचुकार कर्मचाऱ्यांचे फावत असून, प्रशासकीय ढिसाळपणामुळे गरीब रुग्णांना मात्र नाहक हाल सोसावे लागत आहेत.
आवाज उठविणारबीडमधील सत्ताधारी आणि विरोधकांनी अशा प्रकरणांत राजकारण बाजूला ठेवून आरोग्य विभागाला जाब विचारण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच अशा घटना घडत आहेत. आम्ही यावर आवाज उठविणार आहोत.- डॉ. गणेश ढवळे, सामाजिक कार्यकर्ते
लेखी तक्रार करणारव्हायरल व्हिडीओ पाहिला असून, तो खूपच संतापजनक आहे. याची गंभीर दखल घेऊन आरोग्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करणार आहोत. जिल्हा शल्यचिकित्सकांनाही याचा जाब विचारू. मी स्वतः रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतो.- सचिन मुळूक, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना
सत्कार करून सेवेची विनंती करूचार दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती कानावर येत आहे. यासंदर्भात ‘गांधीगिरी’ पद्धतीने एसीएस आणि सीएस यांचा सत्कार करून सेवेची विनंती करू. त्यानंतरही सुधारणा नाही झाली, तर रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढू.- के. के. वडमारे, प्रदेश सचिव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
कर्मचाऱ्यांनी निघून जाणे चुकीचेचसंबंधित परिचारिकेची त्या विभागातून दुसरीकडे बदली केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशीही केली जाणार आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. वृद्ध रुग्ण बाहेर असताना डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांनी निघून जाणे चुकीचेच आहे.- डॉ. सतीशकुमार साळुंके, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
Web Summary : Beed district hospital staff refused to examine an elderly woman brought for a sonography, citing time constraints, despite her being carried down from the second floor. The incident sparked outrage, highlighting ongoing issues with staff negligence and lack of accountability at the hospital.
Web Summary : बीड जिला अस्पताल के कर्मचारियों ने सोनोग्राफी के लिए लाई गई एक बुजुर्ग महिला की जांच करने से इनकार कर दिया, यह कहते हुए कि समय समाप्त हो गया है, जबकि उसे दूसरी मंजिल से नीचे लाया गया था। इस घटना से आक्रोश फैल गया, अस्पताल में कर्मचारियों की लापरवाही और जवाबदेही की कमी के मुद्दों पर प्रकाश डाला गया।