मराठी भाषेमुळे ग्रंथालयीन संप्रेषण गतिमान : संजय भेदेकर - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST2021-02-05T08:24:50+5:302021-02-05T08:24:50+5:30
गेवराई : मानवी इतिहासाच्या प्रारंभापासूनच सुरू असणारे संप्रेषण मराठी भाषेमुळे अधिक गतिमान झाल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. संजय भेदेकर यांनी ...

मराठी भाषेमुळे ग्रंथालयीन संप्रेषण गतिमान : संजय भेदेकर - A
गेवराई : मानवी इतिहासाच्या प्रारंभापासूनच सुरू असणारे संप्रेषण मराठी भाषेमुळे अधिक गतिमान झाल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. संजय भेदेकर यांनी केले.
येथील महिला महाविद्यालयात मराठी विभागाने आयोजित केलेल्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’अंतर्गत संपन्न झालेल्या व्याख्यानात प्रा. डॉ. संजय भेदेकर बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांचन परळीकर होत्या. ‘ग्रंथालयीन संप्रेषण आणि समाज यामध्ये मराठी भाषेची भूमिका’ या विषयावर बोलताना प्रा. डॉ. भेदेकर म्हणाले की, प्रारंभी संप्रेषणासाठी संकेतचिन्हांचा वापर केला जात असे. मुद्रणकलेचा शोध लागल्यानंतर संप्रेषणाची गती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ग्रंथालय व्यवस्थापन अभ्यासक्रम मराठीमध्ये भाषांतरित केल्याने मराठी भाषिकांना खूप उपयोगी ठरला, असे सांगून प्रा. डॉ. भेदेकर यांनी ग्रंथालयांमध्ये मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनाला आणून दिले.
यावेळी भीष्मा रासकर यांनी प्राचीन काळापासून विविध कलांद्वारे संप्रेषण होत असल्याचे सांगितले. लोकसंस्कृतीनेही संप्रेषणात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे डॉ. रासकर म्हणाले. प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. बापू घोक्षे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नामदेव शिनगारे यांनी केले. प्रा. डॉ. प्रवीण शिलेदार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागासह क्रीडा विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रवीण शिलेदार व प्रा. रामहरी काकडे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला प्राध्यापक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.