चांगल्या पावसामुळे जिल्ह्याची वाटचाल टँकरमुक्तीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST2021-03-08T04:31:10+5:302021-03-08T04:31:10+5:30
बीड : जिल्ह्यात कमी पावसामुळे वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागतात. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात १ हजार टँकर पाणी ...

चांगल्या पावसामुळे जिल्ह्याची वाटचाल टँकरमुक्तीकडे
बीड : जिल्ह्यात कमी पावसामुळे वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागतात. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात १ हजार टँकर पाणी पुरवठ्यासाठी यापूर्वी लागलेले आहेत. मात्र, मागील दोन वर्षांत झालेल्या चांगल्या पावसामुळे टँकरमुक्तीकडे बीड जिल्ह्याची वाटचाल सुरू झाल्याचे चित्र असून, यावर्षी देखील बोटावर मोजण्याइतके टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रशासनाकडून टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये १८ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, ५२९ गावांध्ये बोअर व विहीर अधिग्रहण करण्यात येणार आहे, तर १९० गावांमध्ये तात्पुरती पूरक नळ योजना राबवण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील बोअर व विहिरींची दुरुस्ती करण्याची मागणी सरपंचांच्या वतीने करण्यात आलेली आहे. याकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. वेळोवेळी मागणी करून देखील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून हातपंप, विहीर व बोअरची दुरुस्ती होत नसल्यामुळे सरपंच संघटनेकडून संताप व्यक्त केला जात आहे, तर या आठवड्यात मागणीप्रमाणे दुरुस्ती झाली नाही तर, जिल्हाधिकारी तसेच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग प्रमुखांची तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील एकूण ११५२ गावे, ६७४ वाड्या-वस्त्यांसाठी २०८४ पाणीपुरवठा योजना आहेत. त्यासाठी २ कोटी ५६ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा एप्रिल महिन्यासाठी तयार करण्यात आला आहे. उपाययोजना म्हणून हा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. मात्र, टँकरची आवश्यकता भासण्याची शक्यता कमी असून, जरी गरज लागली तर शासकीय टँकरद्वरे पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पाऊस चांगला झाल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई भासणार नाही, असा अंदाज देखील तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे, तर टँकरमुक्तीकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू असल्याचे चित्र सद्य:स्थितीमध्ये दिसत आहे.
जिल्ह्यातील एकूण गावे - १३९३
विहिरींमधील गाळ काढला जाणार -३९
बोअरवेलची दुरुस्ती २८१
विहीर व बोअर अधिग्रहण सुरू
ज्या गावांमध्ये शासकीय हातपंप किंवा विहिरीचे पाणी कमी झाले आहे. त्या गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी खाजगी विहीर व बोअर अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून मागवण्यात आले आहेत. त्यानुसार पुन्हा एकादा स्थळ पाहणी करून प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार आहे.
सुरुवातीला शासकीय टँकरद्वारे होणार पाणीपुरवठा
पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची आवश्यता भासेल असे चित्र नाही. मात्र, जरी तशी परिस्थिती भासली तर, शासकीय टँकरद्वारे सुरुवातीला पाणीपुरवठा केला जाणार आहे, तर जास्त प्रमाणात टंचाई भासल्यास खाजगी टँकरची व्यवस्था करण्यात येईल. त्याठिकाणी देखील जीपीएसच्या माध्यमातून टँकरवर लक्ष ठेवले जाणार आहे.
जलयुक्त शिवार, पाणी फाऊंडेशनचा फायदा
दुष्काळाच्या काळात बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार व पाणी फाऊंडेशन तसेच इतर सेवाभावी संस्थांकडून मृदा व जलसंधारणाची कामे करण्यात आली होती. त्यानंतर सलग झालेल्या दोन वर्षांतील पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूजल पातळी वाढली असून, पाणीटंचाई कमी होणार आहे.
पाणीटंचाई समस्या भेडसावणारी गावे ११७
पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करणार २०८४