दुधाचे भाव घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 04:39 PM2018-06-18T16:39:48+5:302018-06-18T16:39:48+5:30

पशुखाद्याच्या वाढत्या किंमती, सांभाळ करण्यावर दिवसेंदिवस वाढता खर्च त्यात दुधाला भाव नसल्यामुळे बळीराजा हैराण झाला आहे. नाईलाजाने बाजारात जनावरे विकण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.

Due to the downturn in milk, the farmers face financial difficulties | दुधाचे भाव घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत

दुधाचे भाव घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत

Next

- प्रभात बुडूख 

बीड : पशुखाद्याच्या वाढत्या किंमती, सांभाळ करण्यावर दिवसेंदिवस वाढता खर्च त्यात दुधाला भाव नसल्यामुळे बळीराजा हैराण झाला आहे. नाईलाजाने बाजारात जनावरे विकण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. तर दुसरीकडे बाजारात जनावरांची संख्या वाढल्याने गाय-म्हैस व बैलांच्या किंमतीदेखील कमी झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

जिल्ह्यात दुधाचे रोजचे उत्पादन अंदाजे ६.२० लाख लिटर आहे. त्यापैकी जवळपास २.१० लाख लिटर दूध डेअरीच्या माध्यमातून विक्री केली जाते. परंतु दुधाच्या किंमती कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तसेच बीड तालुक्यातील घाटावरील भागात खवा उत्पादनासाठी दुधाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. खव्याचे भाव देखील घसरल्यामुळे संकटात भर पडली आहे. 

दुष्काळी परिस्थिती, नापिकी यासाठी दुग्ध व्यवसाय हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जीवन संजीवनी ठरत होता. मात्र, दुधाचे भाव घसरल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.  दुधाला भाव नसल्यामुळे दुभत्या जनावरांना लागणाऱ्या खुराकावर अधिक खर्च होत आहे. उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने जनावरांची बाजारात कमी किंमतीत विक्री करावी लागत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. 

डेअरी व खवा भट्टीवर दुधाचा भाव १८ ते २४ प्रती लीटरप्रमाणे आहे. परंतु दुभत्या जनावरांना लागणाऱ्या खुराक व चाऱ्याचा खर्च रोज ७०-१०० रूपये होतो. त्यामुळे उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

अनुदानाची मागणी
शासनाने डेअरीवरील दुधाचे भाव वाढवले तरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल व पशुधन शाबूत राहील. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी रोखण्यासाठी दुधाला प्रतिलिटर १० रुपये प्रमाणे फरक अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

१९ जून २०१७ ला दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी गायीचे दूध "२७ प्रतिलिटरने खरेदी करण्याचा अध्यादेश काढला. मात्र, राष्ट्रवादी पुरस्कृत कोल्हापूर, बारामती व पुणे जिल्हा दूध संघांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत आदेशाला स्थगिती मिळवली, असे शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी सांगितले.

दुष्काळी परिस्थिमध्ये शेती उत्पादनावर अवलंबून न राहता दुधामुळे जगण्यास बळ मिळत होते. परंतु दुधाचे भाव कमी झाल्यामुळे दुभती जनावरे विकण्याची वेळ आमच्यावर आली आहे. त्यामुळे शासनाने याचा गांभिर्याने विचार करावा व दुधाच्या किंमती वाढवाव्यात.
- अशोक खंडागळे, दूध उत्पादक शेतकरी

Web Title: Due to the downturn in milk, the farmers face financial difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.