आंदोलनामुळे बीडमध्ये आरोग्य सेवा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:49 IST2018-05-18T00:49:25+5:302018-05-18T00:49:25+5:30

आंदोलनामुळे बीडमध्ये आरोग्य सेवा वाऱ्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आधी बारा दिवस काम बंद आंदोलन, आश्वासनानंतर पंधरा दिवसांची प्रतीक्षा, त्यानंतर पुन्हा नऊ दिवस काम बंद आंदोलन करणा-या राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या जिल्ह्यातील ६०० कंत्राटी कर्मचारी नाशिक ते मुंबई लॉँगमार्चसाठी रवाना झाले. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.
राष्टÑीय ग्रामीण अभियानांतर्गत जिल्ह्यात ६०० कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. शासकीय सेवेत सामावून घ्यावे, समान काम समान वेतन द्यावे तसेच अनुभवाच्या आधारे प्राधान्य द्यावे आदी मागण्यांसाठी या कर्मचाºयांचा लढा सुरु आहे. ११ एप्रिलपासून ६०० कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन पुकारले. जिल्हा परिषदेसमोर सलग १२ दिवस त्यांनी आंदोलन केले. त्यानंतर आरोग्य संचालकांनी दहा दिवसांचा अवधी मागून बैठक घेण्याचे आश्वासन दिले. या कालावधीत शासनाकडून बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे मागण्यांबाबत कोणताही निर्णय झाला नाही. परिणामी ८ मेपासून या कर्मचा-यांनी पुन्हा काम बंद पुकारत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले.
१६ मेपर्यंत सुरु राहिलेल्या या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्य संघटनेने पुकारलेल्या लॉँगमार्चसाठी ६०० कर्मचारी नाशिककडे रवाना झाले आहेत. १८ मेपासून नाशिक ते मुंबई लॉँगमार्च काढण्यात येणार आहे. २८ मेपर्यंत लॉँगमार्च मुंबईत पोहचणार असल्याचे कर्मचारी नेते आर. वाय. कुलकर्णी यांनी सांगितले.
कर्मचाºयांचे आंदोलन सुरु असल्याने आरोग्य सेवेवर होणा-या परिणामामुळे एनआरएचएम समितीचे अध्यक्ष तथा जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिका-यांनी या कर्मचा-यांना ४८ दिवसांच्या आत कामावर हजर राहण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. परंतु या नोटिसा आपल्यापर्यंत पोहोचल्याच नसल्याचे कर्मचा-यांनी सांगितले.
जिल्हा, ग्रामीण रुग्णालयात गर्दी
एनआरएचएम कर्मचाºयांच्या आंदोलनामुळे आरोग्य सत्र सेवा बंद पडली आहे. ग्रामीण भागात प्रसूती इतर उपचार होत नसल्याने रुग्णांची उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात गर्दी वाढली आहे.
बाल आरोग्य सेवेवरही परिणाम
जिल्हा रुग्णालयात कमी वजनाच्या बाळांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) आहे. तेथे नियुक्त कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या सरकारी रुग्णालयातील स्थायी कर्मचा-यांना बोलविण्यात आले आहे. मात्र ते प्रशिक्षित नसल्याने ही उपचार सेवा थंडावली आहे.
‘आयुष्यमान भारत’ ला अडथळा
भारत सरकारने जाहीर केलेल्या आयुष्यमान भारत योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा आरोग्य विमा काढण्यात येणार आहे. यासाठी ३० मे पर्यंत नोंदणी करण्याचे निर्देश आहेत. मात्र या कामावर आशांनी बहिष्कार टाकल्यामुळे व कंत्राटी कर्मचाºयांच्या आंदोलनामुळे ही नोंदणी वेळेत पूर्ण होण्याची शक्यता नाही.