ड्राय रन यशस्वी, आता लसीची प्रतीक्षा - फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:27 IST2021-01-09T04:27:42+5:302021-01-09T04:27:42+5:30
बीड : जिल्ह्यात लवकरच कोरोना लस येत आहे. त्या पार्श्वभूमिवर शुक्रवारी बीड, परळी आणि वडवणीत ड्राय रन घेण्यात आला. ...

ड्राय रन यशस्वी, आता लसीची प्रतीक्षा - फोटो
बीड : जिल्ह्यात लवकरच कोरोना लस येत आहे. त्या पार्श्वभूमिवर शुक्रवारी बीड, परळी आणि वडवणीत ड्राय रन घेण्यात आला. यात ७४ लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ही रंगीत तालीम यशस्वी झाली आहे. आता सर्वांनाच कोरोना लसीची प्रतीक्षा लागली आहे.
जिल्हा रुग्णालयात कोरोना लस देण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आले होते. ओळखपत्र तपासून नाव नोंदणी करण्यात आली. त्यानंतर प्रतीक्षा कक्षातून लसीकरण कक्षात पाठविण्यात आले. लस घेतल्यानंतर निरीक्षण कक्षात अर्धा तास बसविण्यात आले. येथे आशाताई, अंगणवाडी सेविकांमार्फत त्यांच्यावर नजर ठेवून माहिती देण्यात आली. ही रंगीत तालीम सकाळी ९ वाजता सुरू होऊन दुपारी १२ वाजेच्या सुमारास संपली. बीडनंतर वडवणी आरोग्य केंद्र, परळी उपजिल्हा रुग्णालयातही ही तालीम घेण्यात आल. नोडल ऑफिसर संजय कदम यांनी सर्व ठिकाणी भेटी देऊन आढावा घेतला.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील रंगीत तालीमचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, नोडल ऑफिसर डॉ.संजय कदम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूखदेव राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट, डॉ.बाबासाहेब ढाकणे, डॉ.सुधिर राऊत, मेट्रन संगिता दिंडकर, प्राचार्या डॉ.सुवर्णा बेदरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
लसीकरणाचा बनला सोहळा
ड्राय रन साठी सर्व कक्ष फुगे, पडदे, फुले लावून सजविण्यात आले होते. तसेच लाभार्थी येणाऱ्या मार्गावर रांगोळी काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे या ड्राय रनला सोहळ्याचे स्वरूप आले होते. नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे नियोजन केले होते. प्राचार्या डॉ.सूवर्णा बेदरे, मेट्रन संगिता दिंडकर, शैलजा क्षीरसागर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. अजित कुंभार यांनीही याचे कौतूक केले.