कडा बाजार समितीमध्ये सुविधांचा दुष्काळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST2021-02-05T08:22:07+5:302021-02-05T08:22:07+5:30
नितीन कांबळे कडा : जिल्हा, परजिल्हा या ठिकाणावरून आलेला माल महाराष्ट्रात नव्हे परदेशात जाणाऱ्या येथील कृषी उत्पन्न ...

कडा बाजार समितीमध्ये सुविधांचा दुष्काळ
नितीन कांबळे
कडा : जिल्हा, परजिल्हा या ठिकाणावरून आलेला माल महाराष्ट्रात नव्हे परदेशात जाणाऱ्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळ व पणन महासंघाच्या दुर्लक्षतेमुळे शेतकऱ्यांना कसलीच सुविधा मिळत नसल्याने मोठी कुचंबणा होत आहे. आष्टी तालुक्यातील कडा येथील बाजार समितीमध्ये जिल्हा व परजिल्ह्यातून शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात. महाराष्ट्रभर नावलौकिक असलेल्या बाजार समितीमध्ये आल्यावर मात्र शेतकऱ्याला पश्चात्ताप आल्याशिवाय राहत नाही. येथे शेतकरी माल घेऊन आला तर माल उघड्यावर ठेवावा लागतो. शेतकऱ्यांना विश्रांतीसाठी निवारा शेड नाही, स्वच्छतागृह नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, मुतारी नाही, त्याचबरोबर अंतर्गत सिमेंट रस्ते नसल्याने मातीचा फुफाटा मोठ्या प्रमाणावर उडतो. संरक्षक भिंती, मुख्य गेटचे काम रखडल्याने मोकाट जनावरे त्रास देतात. अशा अनेक गैरसोयींमुळे शेतकऱ्यांची कुचंबणा होत आहे. संचालक मंडळ व पणन महासंघाने याकडे दुर्लक्ष न करता ज्यांच्या जिवावर ही बाजार समिती चालते किमान त्यांना तरी सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.
जनावरांसाठीचा पाण्याचा हौद कोरडा
रविवारी या ठिकाणी आठवडी बाजार असतो. बाजारात गाय, बैल, म्हशी, शेळ्या आदी जनावरे विक्रीसाठी दूरदूरहून लोक आणतात. खरेदीसाठीदेखील तेवढीच गर्दी असते. पण दिवसभर जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी हंबरडा फोडावा लागतो. घरी पाणी पाजून बाजारात आणले की परत घरी गेल्यावरच त्यांना पाणी मिळते.
कार्यालयावर लाखोंचा खर्च
संचालक मंडळासाठी लाखो रुपये खर्च करून बाजार समितीचे कार्यालय उभारले आहे. ज्यांचे कष्ट व घामाच्या जोरावर चालणाऱ्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनाच सुविधा देताना दुजाभाव का, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी उपस्थित केला आहे. बाजार समितीत त्वरित सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.
याबाबत कडा कृ.उ. बाजार समितीचे सचिव हनुमंत गळगटे यांना विचारणा करण्यासाठी संपर्क केला असता ते म्हणाले, मी थोडा कामात आहे. नंतर बोलतो म्हणून फोन कट केला.
फोटो, कृ.उ.बा. समिती, पाण्याविना कोरडाठाक हौद.