आष्टी तालुक्यावर दुष्काळाचे सावट, पाच लघु तलाव कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:22 IST2021-07-09T04:22:07+5:302021-07-09T04:22:07+5:30

नितीन कांबळे लोकमत न्यूज नेटवर्क कडा : समाधानकारक पाऊस नसल्याने आष्टी तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तालुक्यातील ...

Drought in Ashti taluka, five small lakes dry up | आष्टी तालुक्यावर दुष्काळाचे सावट, पाच लघु तलाव कोरडेठाक

आष्टी तालुक्यावर दुष्काळाचे सावट, पाच लघु तलाव कोरडेठाक

नितीन कांबळे

लोकमत न्यूज नेटवर्क

कडा : समाधानकारक पाऊस नसल्याने आष्टी तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तालुक्यातील पाच लघु तलाव कोरडेठाक आहेत. तर एक मध्यम व पंधरा लघु असे सोळा तलाव जोत्याखाली आहेत. जेमतेम पाऊस झाल्याने पाणीसाठा अद्याप वाढलेला नाही. पावसाअभावी काही ठिकाणी पिके उगवली नाहीत, तर काही ठिकाणी उगवलेली पिकेही कोमेजू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

कायम दुष्काळाचा सामना करणारा तालुका अशी आष्टी तालुक्याची ओळख आहे. सुदैवाने सलग दोन वर्षे तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर काढले नाही. कोरोनाच्या काळात चारा, पाणीटंचाई न जाणवल्याने प्रशासनालाही दिलासा मिळाला. यंदा तालुक्यातील १ लाख २६ हजार ४२४ लागवडयोग्य क्षेत्रापैकी सुमारे ९० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. अद्याप जेमतेम पाऊस झाला असला तरी बहुतांश भाग दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पावसाअभावी अनेकांची पिके उगवली नाहीत. अनेक ठिकाणी उगवलेली पिकेही कोमेजू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

दरम्यान, यंदा उन्हाळा संपेपर्यंत पाणीटंचाई जाणवली नाही. तालुक्यातील सहा मध्यम व २२ लघु तलावांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा होता. त्यामुळे पावसाळ्यात थोडा आधार मिळाल्यास तलाव भरण्यास मदत होईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु रोहिणी नक्षत्रातील एक-दोन व मृग नक्षत्रातील एखादा अपवाद वगळता तालुक्यात दमदार पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे गेल्या दीड महिन्याच्या काळात आहे तो साठाही कमी कमी होऊन तलावांची पाणीपातळी खाली गेली. पावसाळ्यामुळे उपयुक्त पाणीसाठाही कमी झाला. सध्या तालुक्यातील २२ पैकी १५ लघु पाटबंधारे तलाव जोत्याखाली आहेत, तर पाच तलाव कोरडेठाक आहेत. याशिवाय सहा मध्यम प्रकल्पांमधील एक तलाव जोत्याखाली असून, इतर तलावांमध्येही अल्प पाणीसाठा आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा आहे.

आजपर्यंतचा मंडळनिहाय पाऊस (मि.मी.मध्ये)

आष्टी १३४.६

कडा ११२.६

टाकळसिंग १०४.९

दौलावडगाव ११६.६

धामणगाव ९१.६

धानोरा ८०.५

पिंपळा १५३.१

....

आष्टीकरांची काळजी वाढली

आष्टी शहर व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या रुटी, इमनगाव मध्यम प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. तालुक्यातील क्रमांक दोनचा मोठा प्रकल्प असलेला रुटी तलाव एकदा भरल्यास दोन-अडीच वर्षे पुरतो. परंतु सध्या हा प्रकल्प जोत्याखाली गेल्याने व पाऊस नसल्याने आष्टीकरांची काळजी वाढली आहे.

.....

मध्यम प्रकल्पातील साठा

मेहकरी ५९१.८०० (२३.३२टक्के)

कडा ६०१.४४ (९.४३ टक्के)

कडी ६१६.८६ (२२.१५ टक्के).

रुटी इमनगाव (जोत्याखाली)

तलवार ५६७.७१ (०.३१ टक्के)

कांबळी६६३.२५ (६.८८ टक्के)

एकूण सरासरी पाणीसाठा १४.९९ टक्के.

....

Web Title: Drought in Ashti taluka, five small lakes dry up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.