डॉक्टरांनो सावधान; उपचारातील हलगर्जीमुळे रुग्ण दगावल्यास थेट निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:21+5:302021-08-28T04:37:21+5:30
बीड : शासकीय आरोग्य संस्थेत रुग्ण गंभीर असताना अपघात विभागात त्याची टोलवाटोलवी होते. त्याला वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे ...

डॉक्टरांनो सावधान; उपचारातील हलगर्जीमुळे रुग्ण दगावल्यास थेट निलंबन
बीड : शासकीय आरोग्य संस्थेत रुग्ण गंभीर असताना अपघात विभागात त्याची टोलवाटोलवी होते. त्याला वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे रूग्ण दगावतात; परंतु आता असे झाल्यास संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याचे थेट निलंबन होणार आहे. शासनाने शुक्रवारी तसे आदेश काढले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णसेवेला प्राधान्य देऊन उपचारात हलगर्जी होणार नाही, याबाबत सजग राहण्याची गरज आहे.
अपघात, साप चावलेले, झटका अथवा इतर गंभीर रुग्ण सर्वांत अगोदर अपघात विभागात येतात. येथील वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर उपचार करतात; परंतु नंतरच्या तपासण्या, खाट आदी सुविधांबाबत त्यांना टोलवाटोलवी केली जाते. यात त्यांचा बहुतांश वेळ वाया जातो. अनेकदा रुग्ण दगावल्याचीेही प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. अशाच एका प्रकाराला समोर ठेवून शासनाने शुक्रवारी आदेश काढत कामचुकार डॉक्टरांना चांगलाच दणका दिला आहे. यापुढे अपघात विभागात आलेल्या रुग्णावर उपचार करण्यास हलगर्जी अथवा त्याला इकडे तिकडे पळवापळवी केल्यास थेट निलंबनाची कारवाई केली जाणार आहे, तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ नियम ३ चा भंग केला म्हणून शिस्तभंगाची कारवाईही प्रस्तावित केली जाणार आहे. या आदेशाने आता शासकीय संस्थेतील अपघात विभागात काम करणाऱ्या हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत, तर यामुळे प्रामाणिक डॉक्टरांना समाधान मिळाले आहे.
बीडमध्ये कायम टोलवाटोलवी
येथील जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयात गंभीर रुग्णांवर केवळ उपचार केले जातात. नंतर त्यांच्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. याबाबत नागरिकांनी तक्रारीही केल्या; परंतु डॉक्टरांवर कारवाया झाल्या नाहीत. यामुळेच कामचुकारांचे मनोबल वाढत गेले. आता या निर्णयाने वचक बसणार आहे.