घरकूल लाभार्थ्यांची अडवणूक करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:36 IST2021-08-28T04:36:55+5:302021-08-28T04:36:55+5:30
बीडीओ, सभापतींच्या सूचना आष्टी : तालुक्यातील १२५ ग्रामपंचायती असून घरकुलांची कामे प्रगतिपथावर सुरू आहेत. या योजनेत कोणताही लाभार्थी वंचित ...

घरकूल लाभार्थ्यांची अडवणूक करू नका
बीडीओ, सभापतींच्या सूचना
आष्टी : तालुक्यातील १२५ ग्रामपंचायती असून घरकुलांची कामे प्रगतिपथावर सुरू आहेत. या योजनेत कोणताही लाभार्थी वंचित राहता कामा नये. त्यांचे कोणतेही काम ग्रामसेवक, सरपंच, पंचायत समितीतील गृहनिर्माण अभियंत्यांनी वेळेत करावे. शासन योजनेचा लाभ लाभार्थ्यांना वेळेत मिळावा,कोणाचीही अडवणूक करू नये, अशा सक्त सूचना गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, सभापती माधुरी जगताप यांनी दिल्या आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकूल योजना आणि शबरी घरकूल योजना सुरू आहेत. तालुक्यात १ हजार ६५० घरकूल मंजूर झालेले आहेत. यामध्ये ४५० प्रधानमंत्री आवास योजनेचे पूर्ण झाली, तर रमाई घरकुल योजनेतील ४० घरकुले पूर्ण झालेली आहेत. उर्वरित तालुक्यातील घरकुलांची कामे सुरू असून, ती डिसेंबर अखेरीस पूर्णत्वास येण्यासाठी ग्रामपंचायतींनी घरकूल लाभार्थ्यांना कागदपत्रे वेळेत द्यावीत. कोणाचीही अडवणूक करू नये.
ग्रामसेवकांना तंबी
ग्रामसेवकांनी विविध विकास योजनेचे दप्तर पूर्ण करून ठेवावे. ग्रामसेवकांनी हलगर्जीपणा केल्यास गय केली जाणार नाही. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशा सूचना सभापती माधुरी जगताप, उपसभापती रमेश तांदळे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.