निधीसाठी नांदुरघाट ग्रामपंचायतला ठोकले दिव्यांगांनी टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:07+5:302021-07-08T04:23:07+5:30
नांदुरघाट : गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊनसुद्धा दिव्यांगांचा हक्काचा ५% निधी नांदुरघाट ग्रामपंचायत देत नाही. मागील तीन महिन्यांपासून वारंवार ...

निधीसाठी नांदुरघाट ग्रामपंचायतला ठोकले दिव्यांगांनी टाळे
नांदुरघाट : गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊनसुद्धा दिव्यांगांचा हक्काचा ५% निधी नांदुरघाट ग्रामपंचायत देत नाही. मागील तीन महिन्यांपासून वारंवार विनंती करूनसुद्धा काहीच फरक पडत नाही म्हणून गावातील ४० ते ५० दिव्यांग आक्रमक झाले व दिव्यांग प्रहार संघटना यांच्या वतीने हक्कासाठी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावले. जोपर्यंत निधी देत नाहीत, तोपर्यंत कुलूप उघडणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता.
यावेळी सर्व दिव्यांग व्यक्तींनी ग्रामपंचायतविरोधात घोषणा दिल्या. दिव्यांगांसाठी येणारी पिठाची गिरणी परस्पर उचलून पैसे खाल्ले, असादेखील आरोप यावेळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष पप्पू नाळपे यांनी केला. माझ्या नावावर एक लाख वीस हजार रुपयाची झेरॉक्स मशीन उचलली, परंतु मला एक रुपयाही दिला नाही किंवा मशीन दिली नाही असादेखील आरोप केला. २०१४ पासून दिव्यांगांचा एक रुपया निधी दिला नाही. नांदुरघाटला स्मार्ट व्हिलेज म्हणून बीड जिल्ह्यात पहिले पारितोषिक मिळाले. जवळपास ३० लाख रुपये बक्षीस मिळाले. नेमक्या कोणत्या आधारे नांदुरघाट स्मार्ट व्हिलेज अधिकाऱ्यांनी काढले हे समजण्यापलीकडे आहे, असे आदिवासी सेल तालुका अध्यक्ष रोहित हंगे व मनसेचे नारायण हंगे यांनी प्रश्न केला.
मागील पंधरा वर्षांपासून गावाला नळयोजनेद्वारे पिण्यासाठी पाणी नाही, स्वच्छता नाही, गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी २ योजना करोडो रुपये पाण्यात जाऊन साधे पाणी नाही, कधी ग्रामसभा नाही, गावाला सहा महिने ग्रामसेवक नाही, सुविधा नाहीत, असा आरोप हंगे यांनी केला. दुपारनंतर सरपंच आले व पंधरा दिवसांत निधी गोळा करून तुम्हाला दिला जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले.
सतत दोन वर्षे लॉकडाऊन असल्यामुळे लोकांना त्रास नको म्हणून वसुली केली नाही. तरी पंधरा दिवसांत वसुली करून सर्व दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचा ५% निधी देण्यात येईल.
- पांडुरंग चांगण, सरपंच नांदुरघाट
१६ सदस्य संख्या असणारी मोठी ग्रामपंचायत
जिल्ह्यामधील सर्वात जास्त निधी या ग्रामपंचायतला आला. बाजार कर, घरपट्टी, पीटीआर खरेदी खताचा टॅक्स, गाळे भाडे, प्रत्येक घराला विकत पाणी. मग एवढा आलेला निधी व पैसा नेमका गेला कुठे? आम्ही सर्व दिव्यांग हे बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतमध्ये तीव्र आंदोलन करू व पुढील जबाबदारी ग्रामपंचायतची राहील.
- विशाल नाळपे, दिव्यांग प्रहार संघटना अध्यक्ष नांदुरघाट
070721\1625655875742_14.jpg