जिल्हाधिकाऱ्यांनी दिली नवोदय विद्यालयास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:31 IST2021-03-07T04:31:05+5:302021-03-07T04:31:05+5:30
बीड : गेवराई तालुक्यातील गढी येथे असलेल्या नवोदय विद्यालयातील १२ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आल्याने, जिल्हा प्रशासनाने दखल घेत तातडीने ...

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली नवोदय विद्यालयास भेट
बीड : गेवराई तालुक्यातील गढी येथे असलेल्या नवोदय विद्यालयातील १२ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आल्याने, जिल्हा प्रशासनाने दखल घेत तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. नवोदय निवासी विद्यालयास जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी तातडीने भेट दिली. यावेळी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करून, त्यांनी संबंधित यंत्रणांना तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
नवोदय विद्यालयात १०२ विद्यार्थी निवासी पद्धतीने शिक्षण घेत असून, त्यासह २७ कर्मचारीही आहेत. येथे असणाऱ्या विद्यार्थ्यांसह अध्यापक, कुटुंबीय आणि कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले असून, त्यामध्ये प्राचार्य आणि अध्यापक या दोघांसह कुटुंबातील दोन सदस्य, एक आचारी व एक मेस कर्मचारीही कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
एकाच वेळी अनेक जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आल्याने, जिल्हाधिकारी जगताप यांनी येथील नवोदय विद्यालयातील सर्व विद्यार्थी अध्यापक कर्मचारी आदींच्या कोरोना तपासणीसाठी आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना स्वतंत्ररीत्या विद्यार्थी वसतिगृहात क्वारंटाईन ठेवण्यात आले असून, अध्यापक-कर्मचारी यांना नवोदय विद्यालय परिसरातील त्यांच्या निवासस्थानी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यासह येथे करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची पाहणी करून, संबंधित आरोग्य यंत्रणेला जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. यावेळी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
===Photopath===
060321\062_bed_17_06032021_14.jpg
===Caption===
नवोदय विद्यालयात चर्चा करताना जिल्हाधिकारी रवींद्र जगताप उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर आदी.