पार्किंगवरून होणारे वाद आता टळणार, पोलिसांनी तयार केली नवीन नियमावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST2021-03-21T04:32:38+5:302021-03-21T04:32:38+5:30
बीड : जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी वाहतूककोंडी झाल्यामुळे मानसिक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. याचे मुख्य कारण म्हणजे ...

पार्किंगवरून होणारे वाद आता टळणार, पोलिसांनी तयार केली नवीन नियमावली
बीड : जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी वाहतूककोंडी झाल्यामुळे मानसिक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. याचे मुख्य कारण म्हणजे अस्ताव्यस्त पार्क केलेली वाहने असतात. यासाठी वाहतूक शाखेकडून नवीन नियमावली तयार करण्यात आली असून, आठवड्यातील वाराप्रमाणे पी १ व पी २ सम आणि विषम या पद्धतीने वाहने पार्क करण्यात येणार आहेत. त्यामुळे पार्किंगच्या कारणावरून पोलीस आणि वाहनचालक यांच्यात होणारे वाद टाळण्यासदेखील मदत होणार आहे.
शहरातील बाजारपेठेमध्ये वाहने कोणत्याही दिशेला पार्क केल्यामुळे मोठी वाहतूककोंडी होते. ही परिस्थिती जिल्ह्यातील बीड, गेवराई, आष्टी, अंबाजोगाई, परळी वैजनाथ, माजलगाव, केज या शहरात जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे या शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये व्यापारी, नागरिक व तज्ज्ञांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी सम व विषम दिवसानुसार पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासंदर्भात बाजारपेठेमध्ये व गर्दीच्या ठिकाणी तसे बोर्डदेखील लावले जाणार आहे. वाहतूक शाखेने केलेल्या या नवीन नियमावलीमुळे वाहनांच्या पार्किंगमुळे होणारी वाहतूककोंडी यापुढे होणार नाही. तसेच वाहतूक पोलिसांचादेखील ताण या नियमामुळे कमी होणार आहे. नागरिकांनीदेखील वाहन पार्किंग नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशी असणार बीड शहरातील पार्किंगची दिशा
रस्त्याची सुरुवात रस्ता शेवट पी१ पी२
जिजामाता चौक सुभाष रोड पूर्व पश्चिम
माळीवेस चौक बलभीम चौक पश्चिम पूर्व
तुळजाई चौक शिंदेनगर कमान पूर्व पश्चिम
अण्णाभाऊ साठे चौक अंबिका चौक दक्षीण उत्तर
इतर शहरातदेखील हाच नियम लागू असणार
बीडप्रमाणेच अंबाजोगाई, परळी, गेवराई माजलगाव, केज आष्टी या शहरांमध्ये पार्किंगचे नियम असणार आहेत. या नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, या पार्किंगच्या नियमांमुळे अपघात व वाहतूककोंडी होणार नसून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
मुख्य शहरातील वाहतूककोंडी रोखण्यासाठी ही नियमावली राबविण्यात येणार आहे. या नियमांसंदर्भात जनजागृती केली जाईल. नगरपालिकेच्या माध्यमातून दिशादर्शक लावले जातील, काही दिवसांनंतर मात्र नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल.
- सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, बीड