निवडणुका तोंडावर भाजपमध्ये निरुत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:54+5:302021-08-28T04:37:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परळी : मतदार संघातील वैद्यनाथ सहकारी बँक, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, जिल्हा बँकेतील रिक्त जागा, परळी ...

निवडणुका तोंडावर भाजपमध्ये निरुत्साह
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : मतदार संघातील वैद्यनाथ सहकारी बँक, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, जिल्हा बँकेतील रिक्त जागा, परळी नगर परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या संस्थांच्या निवडणुकीसाठी मात्र भाजपच्या गोटात काहीच हालचाल दिसत नाही. पदाधिकारी निरुत्साही दिसत असल्याचे चित्र आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून झालेल्या पराभवापासून पक्ष सावरल्या नसल्याचे चित्र सध्या परळी मतदारसंघात दिसून येत आहे. खा. प्रीतम मुंडे यांना न मिळालेले मंत्रिपद, यानिमित्त झालेले पदाधिकाऱ्यांचे राजीनामा नाट्य यानंतर शहरात झालेले काही कार्यक्रम वगळता भाजपकडून कुठलेही कार्यक्रम, बैठका झाल्याचे दिसून येत नाही. आगामी सहा महिन्यांत महत्त्वाच्या संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत. परंतु निवडणुकीच्या दृष्टीने पक्षांतर्गत कुठलीही हालचाल दिसून येत नाही. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे असताना त्यांनी तयार केलेले शहराचे पदाधिकारी मागील १४ वर्षांपासून बदलले गेले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून कुठलेही नवीन कार्यक्रम होत नाहीत. भाजप तालुकाध्यक्ष निवडून एक वर्ष होऊन गेले आहे. परंतु उर्वरित कार्यकारिणी न निवडल्यामुळे तालुका भाजपचे सुद्धा कुठलेही कार्यक्रम दिसून येत नाहीत. भाजयुमोची स्थिती ही यापेक्षा वेगळी नाही. माजी मंत्री पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक युवा चेहरे या मतदार संघात भाजपचे प्रतिनिधित्व करतात. परंतु युवा मोर्चा आक्रमक झाल्याचे दिसून आले नाही. पक्षातील पदे नावापुरतीच राहिली आहेत. गटबाजीने युवक नेतृत्वाना संधी मिळत नाही. युवकात नाराजी आहे. मतदार संघाला महिला नेतृत्व असूनही शहरात नसलेली महिला आघाडी सुद्धा पक्षाच्या काळजीचा विषय आहे. पंकजा मुंडे यांनी चालू केलेले द टर्निंग पॉईंट व गौरी-गणपतीसारखे जनसामान्यात अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम सुद्धा कोरोनामुळे बंद पडले आहेत. यामुळे मुंडे यांचा महिलांशी थेट संवाद राहिला नाही. सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी पक्षाला टक्कर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, कार्यकर्त्यांना आगामी काळात मरगळ झटकून कामाला लागावे लागणार आहे. यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.