सतीश जोशी - बीड : केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न देऊन लागोपाठ तिसऱ्यांदा मुंडे भगिनींना भाजपने धक्काच दिला नाही, तर औरंगाबादच्या डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद देऊन पर्यायी नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केल्याची मुंडे समर्थकांत चर्चा आहे. एकापाठोपाठच्या घटनांमुळे पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे या भगिनींची नाराजी या राजकीय मौनातून उघड उघड दिसत आहे.गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा मुंडे यांनी ओबीसी नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतली. ‘जनतेच्या मनातील मी मुख्यमंत्री’ असे वक्तव्य करून पंकजा मुंडे यांनी नाराजी दाखविली होती. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूूमीवर मुंडेंनी ‘आम्ही मुंबईतच आहोत,’ असे एकच ट्विट केले होते. त्यानंतर मात्र त्या माध्यमांशी काहीही बोलल्या नाहीत. त्यांच्या समर्थकांनी मात्र समाज माध्यमाद्वारे संताप व्यक्त केला आहे.
दोघींना बदनाम करु नका : फडणवीसमुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा निरर्थक असल्याचे सांगतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपदाच्या वाटपाबाबत सर्व समाधानी आहेत, उगाच भांडणे लावू नयेत. कुणालाही अकारण बदनाम करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असा इशारा दिला.