ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:31 IST2021-03-07T04:31:01+5:302021-03-07T04:31:01+5:30
बीड जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गाचे न्याय्य प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठक घेऊन ८ वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न सोडविले. उर्वरित प्रश्न ...

ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस
बीड जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गाचे न्याय्य प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठक घेऊन ८ वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न सोडविले. उर्वरित प्रश्न सोडविण्याची कार्यवाही सुरू आहे. असे असलेतरी कामबंद आंदोलन करण्याबाबत ग्रामसेवक संघटना भूमिका घेत आहेत तसेच परवानगीशिवाय निवेदन काढून प्रसारमाध्यमातून केल्या जाणाऱ्या प्रसिद्धीमुळे जिल्हा परिषद प्रशासनाची प्रतीमा मलीन होत आहे. चुकीच्या मार्गाने प्रशासनावर दबाव टाकून जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमातील तरतुदींचे वारंवार उल्लंघन होत असल्याने ही नाटीस बजावली आहे. ग्रामसेवकांमध्ये प्रशासनविषयी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याने शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशी नोटीस संघटनेचे अध्यक्ष बळीराम उबाळे, राज्य उपाध्यक्ष मधुकर शेळके, जिल्हा सरचिटणीस भगवानराव तिडके यांना बजावण्यात आली आहे.
एखाद्या कर्मचारी अथवा अधिकाऱ्याला नोटीस बजावल्यानंतर नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार त्यास बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यानुसार संबंधिताने वैयक्तिकरित्या खुलासा करून आपली भूमिका मांडणे अपेक्षित असते. मात्र, संघटनेच्या माध्यमातून प्रशासनच्या संभाव्य प्रक्रियेवर दबाव आणला जात असल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे.
-----
११४ ग्रामपंचायतीमधील ४४७ जणांना नोटीस
केज पंचायत समितीमध्ये नरेगाबाबत जी चौकशी झाली त्यानुसार दोषी दिसून आलेले सरपंच, ग्रामसेवक, तांत्रिक अधिकारी, शाखा अभियंता, सहायक कार्यक्रम अधिकारी, ऑपरेटर, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी या सर्वांनाच नोटीस देऊन खुलासा मागितला आहे. ११४ ग्रामपंचायतींमधील ४७४ कर्मचारी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावून खुलासा मागितल्याचे जि. प. प्रशासनाने कळविले आहे.
-------
ग्रामसेवक संघटनेचे म्हणणे...
केज तालुक्यातील रोहयोमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे नरेगा घोटाळा ग्रामसेवकांच्या माथी लादला आहे. मोजमापपुस्तिका,अंदाजपत्रक प्रत्यक्ष कामावर खर्च यांच्याशी नोटीसचा ताळमेळ लागत नाही. काही गावांमध्ये नरेगातून कुठलेही काम झाले नसताना ज्याचा खर्च शून्य आहे, अशा पण गावच्या ग्रामसेवकांना गुन्हा दाखल करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. अशा प्रकारच्या जाचास ग्रामसेवक वैतागले आहेत तसेच ग्रामसेवकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत असल्याने बैठकीनंतर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई १३६ जिल्हा शाखेने असहकार आंदोलनाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे.
------------
===Photopath===
060321\062_bed_19_06032021_14.jpg
===Caption===
जिल्हा परिषद