जिल्हा रूग्णालयात दिव्यांगांची फरफट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST2021-01-08T05:48:11+5:302021-01-08T05:48:11+5:30
बीड : जिल्हा रूग्णालयात प्रत्येक बुधवारी दिव्यांगांसाठी बोर्ड असतो. परंतु येथे आल्यानंतर त्यांची फरफट होत असल्याचे दिसत आहे. असाच ...

जिल्हा रूग्णालयात दिव्यांगांची फरफट
बीड : जिल्हा रूग्णालयात प्रत्येक बुधवारी दिव्यांगांसाठी बोर्ड असतो. परंतु येथे आल्यानंतर त्यांची फरफट होत असल्याचे दिसत आहे. असाच प्रकार बुधवारीही अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्या कक्षासमोर दिसून आला. दिव्यांगांनी कक्षाबाहेर गर्दी केली होती. यावेळी त्यांचे हाल झाले.
कोरोनाकाळात दिव्यांगांसाठीचा बोर्ड बंद होता. परंतु आता रूग्ण कमी झाल्याने हा बोर्ड सुरू करण्यात आला. विविध तपासण्या करण्यासाठी आणि प्रमाणपत्र घेण्यासाठी जिल्हाभरातील शेकडो दिव्यांग व्यक्ती पहाटेपासूनच जिल्हा रूग्णालयात येऊन रांगा लावतात. परंतु येथे वेळेवर कधीच डॉक्टर हजर राहात नाहीत. आले तरी काही ना काही त्रुटी काढून अपंगांना परत पाठवितात. कान, नाक, घसा तज्ज्ञ नसल्याने अंबाजोगाईला जाण्याचा सल्ला दिला जातो. आष्टीहुन आलेला रूग्ण अंबाजोगाईला पाठविला जातो. जिल्ह्याच्या एका टोकावरील रूग्ण दुसऱ्या टोकावर जाताना विचार करतो, आणि या त्रासाला कंटाळून पुन्हा रूग्णालयात फिरकत नाही. असे अनेक प्रकार यापूर्वीही उघड झालेले आहेत. असे असतानाही आरोग्य विभाग या दिव्यांगांचे हाल थांबविण्यासाठी उपाययोजना करीत नसल्याचे दिसत आहे. बुधवारी तर चक्क एसीएस डॉ.राठोड यांच्या कक्षासमोरच रांगा लागल्याचे दिसले. येथे कोरोनाचे कसलेही नियम पाळले जात नाहीत. आगोदरच फरफट त्यात कोरोनाचीही भिती असल्याने दिव्यांगांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रत्येक बुधवारी सर्व संबंधित डॉक्टरांना हजर राहण्यास सांगून दिव्यांगांचे हाल थांबवावेत, अशी मागणी सामान्यांमधून होत आहे.
एसीएसचा कॉल वेटींगवर
याबाबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांना ७ वाजता संपर्क केला. परंतु त्यांचा भ्रमणध्वनी वेटींगवर होता. त्यानंतर त्यांचा परत फोन न आल्याने बाजू समजली नाही. तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांचा भ्रमणध्वनी नॉट रिचेबल सांगण्यात आला.