रेशन कार्डवरील मोफत धान्य आपल्याला मिळाले का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:30+5:302021-06-23T04:22:30+5:30
बीड : अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किले गहू, असे पाच किलो धान्य ...

रेशन कार्डवरील मोफत धान्य आपल्याला मिळाले का?
बीड : अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किले गहू, असे पाच किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दरम्यान, या धान्याचे काही प्रमाणात वाटप रेशन दुकानांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, अद्याप अनेक गावांमध्ये या मोफत धान्याचे वाटप मात्र दर महिन्याला करण्यात येत नाही. त्यामुळे अनेकांना मोफत धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.
कोरोना संसर्ग वाढल्यामुळे राज्य शासनाकडून संचारबंदीसह निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे जवळपास सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. पुन्हा बाजारपेठ खुली झाली आहे. मात्र तरीदेखील आर्थिक घडी बसण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागणार आहे. दरम्यान, अन्नधान्याविना उपासमार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला होता; परंतु अद्याप धान्यवाटपासंदर्भात काही गावांमध्ये सुमार कामगिरी असल्याचे दिसून येत आहे. मोफतच्या धान्यावर अवलंबून असलेल्यांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे. या मोफत धान्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. मात्र या योजनेमधून मिळणारे धान्य वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा?
सरकारने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दर महिन्याला धान्य मिळाले नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. घोषणा केल्याप्रमाणे तत्काळ धान्य वाटप करावे.
- राजेश वंजारे
मागील दोन महिन्यांपासून काम नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाने घोषणा केली. मात्र, धान्य दुकानदारांकडून वाटप अद्याप सुरू झाले नाही. रेशन दुकानातून मोफत धान्य वेळच्या वेळी देणे गरजेचे आहे.
- रोहित काळे
गेल्या वर्षापासून काम मिळणेदेखील कठीण झाले आहे. मोफत धान्यामुळे मागील वर्षीदेखील दिलासा मिळाला होता. त्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली होती. मात्र, आणखी हातचे काम गेले आहे. त्यामुळे घोषणा केल्याप्रमाणे धान्याचे वाटप मात्र वेळेवर होत नाही.
- महारुद्र वाघ
जिल्हा पुरवठा अधिकारी
मोफत धान्याचे वाटप वेळच्या वेळी सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी होत नसेल तर, गावकऱ्यांनी तक्रार करावी. त्या संदर्भात चौकशी करून संबंधित दुकान कायमचे रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल.
- मच्छिंद्र सुकटे, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड
धान्य घेतल्यानंतर अंगठा लावाच
अंगठा लावल्याने कोरोना पसरेल अशी भीती व्यक्त करीत ई-पॉस मशीनवर फक्त रेशन दुकानदाराचा अंगठा लावण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. याचाच गैरफायदा घेत काही ठिकाणी हे धान्य काळ्याबाजारात विक्री केले जात असल्याची माहिती आहे.
नागरिकांनी सतर्क राहून दर महिन्याला मोफत धान्य घ्यावे. तसेच धान्य देत नसेल तर त्याची तक्रार जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अंत्योदय ४०,२८८
केशरी ३,४९,३६९
एपीएल शेतकरी ५४,५४७