चिंचाळ्यात दूषित पाण्यामुळेच पसरली अतिसाराची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST2021-07-21T04:23:25+5:302021-07-21T04:23:25+5:30
लोकमत फाॅलाेअप बीड : वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथील अतिसाराच्या साथीचे कारण मंगळवारी उघड झाले. गावात सार्वजनिक नळातून दूषित पाणी ...

चिंचाळ्यात दूषित पाण्यामुळेच पसरली अतिसाराची साथ
लोकमत फाॅलाेअप
बीड : वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथील अतिसाराच्या साथीचे कारण मंगळवारी उघड झाले. गावात सार्वजनिक नळातून दूषित पाणी पुरवठा झाल्यानेच ही साथ पसरली आहे. गावातून घेतलेले दोन्ही पाणी नमुने दूषित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. तसेच चौथ्या दिवशीही अतिसाराचे तब्बल ४६ रूग्ण निष्पन्न झाले. ही साथ आटोक्यात आणण्यात अद्यापही आरोग्य विभागाला यश आलेले नाही.
चिंचाळा येथील अतिसाराची साथ आणखीनच गंभीर बनत चालली आहे. अगोदर १९१ रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी आणखी ४६ रुग्णांची भर पडली. या सर्वांवर गावातीलच आरोग्य उपकेंद्रातच उपचार केले जात असले तरी गावातील साथ आटोक्यात येत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागाच्या पथकाकडून गावात सर्वेक्षण केले जात आहे. तसेच पथक गावात तळ ठोकून असले तरी अद्याप साथ नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी गावातीलच प्रभाकर मुंडे व शंकर काळे यांच्या घरातील पाणी नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीला पाठविले होते. मंगळवारी याचे अहवाल प्राप्त झाले असून हे दोन्ही नमुने दूषित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे गावातील अतिसाराच्या साथीचे कारण हे दूषित पाणी पुरवठा असल्याचे उघड झाले आहे.
सीएचओंवर जबाबदारी टाकून डॉक्टर पुन्हा गायब
चिंचाळा गावातील अतिसाराच्या साथीचे प्रकरण राज्यभर गाजले आहे. ही साथ गंभीर असून रुग्णसंख्या पाहता गावात एक एमबीबीएस डॉक्टर उपस्थित असणे आवश्यक आहे. परंतु, कुप्पा आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकून गायब होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थ खाजगी दवाखान्यांची पायरी चढत आहेत. यात आर्थिक लूट होत आहे.
---
चिंचाळा गावातील रुग्णसंख्या २३७ झाली आहे. गावात नियमित सर्वेक्षण सुरू असून चौथ्या दिवशी ४६ रुग्ण आढळले. वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या जातील. गावातील दोन पाणी नमुने दूषित आढळले आहेत.
डॉ.मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी, वडवणी