परळी : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सत्तेच्या काळात परळीसाठी आणलेल्या विविध कामांच्या निधीचे श्रेय घेण्याचा पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा आटापिटा अजूनही सुरूच आहे. परळी बसस्थानकासाठी पंकजा मुंडेंनी निधी मंजूर करून आणलेला असताना त्याचेही श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत असल्याचा आरोप परळीच्या भाजप शाखेने केला आहे.
पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री असताना परळीसाठी विविध कामांकरिता मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला होता. वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास असो, शहरातील रस्ते असो की राष्ट्रीय महामार्ग, ह्या सर्वांसाठी त्यांनी अतिशय तळमळीने प्रयत्न केले होते. परळी बसस्थानकाच्या नव्या इमारतीसाठीसुद्धा त्यांनी ५ कोटी ४५ लाखांचा निधी मंजूर करून आणला, त्याच्या कामाचे भूमिपूजन खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते सप्टेंबर २०१९ मध्ये झाले होते. त्यानंतर आचारसंहिता लागली; पण प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया सुरू झाली होती. आता या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, लवकरच काम सुरू होणार आहे, असे असले तरी पालकमंत्री धनंजय मुंडे हे या कामाचे श्रेय घेत आहेत, असा आरोप परळीच्या भाजप शाखेने केला आहे.
पालकमंत्री मात्र श्रेयासाठी पुढे !
पालकमंत्री धनंजय मुंडे सत्ता आल्यानंतर स्वतःच्या क्षमतेवर ते एक रुपयाचा देखील निधी सरकारकडून खेचून आणू शकले नाहीत. आता मतदारसंघात जी काही कामे सुरू आहेत, ती पंकजा मुंडे यांच्याच काळातील आहेत. पालकमंत्री मात्र आयत्या आलेल्या निधीवर डोळा ठेवून तो निधी आपणच आणल्याचे श्रेय घेत आहेत, परळी बसस्थानकाच्या कामाबाबतही त्यांनी अशाच आयत्या श्रेयाचा कित्ता गिरवला आहे, असा आरोपही भाजपने केला आहे.