- संजय खाकरेपरळी: बीड येथे बंजारा समाजाच्या मोर्चात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाल्यानंतर माजी कृषिमंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी तातडीने आपल्या विधानाचा विपर्यास झाल्याचे स्पष्ट केले आहे. ‘वंजारा आणि बंजारा जात, संस्कृती आणि बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत’ असे सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
सोमवारी (दि. १६) बीड शहरात बंजारा समाजाने एस.टी. आरक्षणाच्या मागणीसाठी विराट मोर्चा काढला होता. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेल्या धनंजय मुंडे यांनी भाषण करताना ‘वंजारा आणि बंजारा एक आहोत’ असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर बंजारा समाजाने तीव्र आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. १९९४ मध्ये तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांनीही असेच विधान करून बंजारा समाजाचे २.५ टक्के आरक्षण हिरावून घेतल्याचा आरोप करत समाजाने धनंजय मुंडेंनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती.
बीडमध्ये वाद पेटलेला असतानाच, धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (दि. १७) पहाटेच्या अतिवृष्टीमुळे परळी तालुक्यातील शेती व पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी वानटाकळी, बोधेगाव, मोहा, वंजारवाडी आणि गडदेवाडी येथे शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानीचा आढावा घेतला. याच दौऱ्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना बीड येथील विधानावर स्पष्टीकरण दिले.
मुंडे म्हणाले, “वंजारा आणि बंजारा या दोन वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्यांच्या सगळ्या गोष्टीही वेगळ्या आहेत. बीडमध्ये चांगला कार्यक्रम असताना काही विघ्नसंतोषी मंडळींनी जाणूनबुजून माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढून गैरसमज पसरवला.” बंजारा समाजाचे स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यावर पहिल्यापासून कायम प्रेम राहिले आहे. त्या प्रेमातूनच मी हे बोललो होतो. पण चुकीच्या घोषणा देणारे कोण आहेत, हे आता सोशल मीडियावर समोर येत आहे, असेही मुंडे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासनपाहणी दौऱ्यात मुंडे यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की, “शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. कापसासह इतर पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असून, शासनाने तातडीने मदत करावी अशी विनंती आम्ही केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणात लक्ष घातले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळेल.”
रेल्वेचे स्वप्न पूर्ण होत आहे,दरम्यान, परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाच्या कामावरही मुंडे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, “बीड-नगर रेल्वेचे स्वप्न पूर्ण होत आहे, तर परळी-बीड रेल्वेचे स्वप्न पुढील वर्षात पूर्ण होईल. यासाठी अजित पवार यांनी लक्ष घातले असून, पंकजा मुंडे यांनीही या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न केले आहेत,” असे सांगत त्यांनी पंकजा मुंडे यांचेही कौतुक केले.