Beed Coaching Class Torture Case: बीडमध्ये अकरावीच्या वर्गातील विद्यार्थिनीचा लैगिंक छळ केल्याच्या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे. बीड शहरातील नावाजलेल्या उमाकिरण शैक्षणिक संकुलात विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन शिक्षकांनी एका अकरावीच्या वर्गातील मुलीचा वर्षभर लैंगिक छळ केला. विद्यार्थिनीला केबिनमध्ये नेत लैंगिक छळ करणाऱ्या दोन्ही शिक्षकांना पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे बीडमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलात विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या शिक्षकांनी नीट परिक्षेची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केला. फरार असलेल्या दोन्ही शिक्षकांना अटक करण्यात आली. बीड न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावरून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आरोपी शिक्षक विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर राईट हॅन्ड असल्याचा आरोप केलाय. यासोबत धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नेमण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे केली आहे.
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत माहिती दिली. तसेच या प्रकरणात सर्व पालक संशय व्यक्त करत आहेत त्याप्रमाणे आणखी काही मुलींवर देखील असे अत्याचार झाले असून, ही सर्व प्रकरणे समोर येणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आरोपी, त्यांना मदत करून पाठीशी घालणारे याची सखोल चौकशी केली जावी व दोषींना कठोर शिक्षा दिली जावी, यासाठी बीड जिल्ह्याबाहेर सेवेत असलेल्या अनुभवी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नेमून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जावा अशी आग्रही मागणी केली. मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले असून, बीड प्रकरणातील संपूर्ण सत्य नक्कीच बाहेर येईल, असा विश्वास आहे. बीड सह राज्यात सर्वच ठिकाणी खाजगी कोचिंग क्लासेस चालकांना फी मर्यादा, वसुलीची पद्धत, विद्यार्थ्यांची सुरक्षा याबाबत नैतिक व कायदेशीर संहिता असावी, यादृष्टीने एक व्यापक नियमावली शासनाने निर्गमित करावी, अशीही मागणी यावेळी केली असून याबाबतही सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहे," असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
संदीप क्षीरसागरांवर थेट आरोप
"बीडमधील खासगी शिकवणीचालक आणि अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आरोपी विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळेच विजय पवारला आमदार क्षीरसागर यांनी बीडच्या शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष केले होते. विजय पवारविरुद्ध गुन्हा दाखल झाला त्याच रात्री तो आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत होता आणि त्या पुढच्या दोन दिवसात पीडितेच्या वडिलांना २० फोन गेले," असा आरोप धनंजय मुडेंनी केला.
"दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली नाही तर त्यांनी पोलिसांकडे सरेंडर केलंय. त्यामुळे दोन्ही आरोपी आणि संदीप क्षीरसागर यांचे सीडीआर काढावेत. ज्या रात्री गुन्हा नोंद झाला. त्याच दिवशी अकरा वाजता बीडचे आमदार संदीप क्षिरसागर हे आरोपीसोबत होते. हे पोलीस तपासात समोर येणं आवश्यक आहे. ते सोबत का होते? यामागचं कारण काय? आरोपीचं आणि आमदारांचं कनेक्शन काय, हे कळायला हवं," असंही धनंजय मुंडे म्हणाले.