बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. विचारात न घेता आणि मजकूर न दाखवताच माझी सही कशी वापरली? असा सवाल उपस्थित करत संतोष यांचे भाऊ धनंजय देशमुखांनी वकिलाला झापले. याचा एक कथित व्हिडीओ कॉल व्हायरल झाला आहे. खोटी स्वाक्षरी करून औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती, परंतू ती याचिका मागे घेतल्याचा दावाही देशमुख यांनी केला आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड, हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचा आरोप केला जात आहे. त्याच्यावर हत्येच्या गुन्हा दाखल करा आणि मोक्का लावा, या मागणीसह धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही देशमुखांनी याचिकेत केली होती. परंतु हे सर्व खोटे असून वकिलाने विश्वासात न घेताच याचिका दाखल केल्याचे एका कथित व्हायरल व्हिडीओवरून समोर आले आहे. न कळवता वकिलाने स्वतःच याचिका दाखल केली, असा निर्वाळा धनंजय देशमुखांनी केला आहे.
व्हायरल संभाषण काय आहे ?
चुकीच्या पद्धतीने माझी सही का केली? या मागचा हेतू काय आहे, असा सवाल धनंजय यांनी वकिलाला विचारले. त्यातील मुद्दे, मजकूर दाखल करण्यापूर्वी विचारायला हवा होता, असे धनंजय देशमुख म्हणाले. यावर, वकिल म्हणाले की, तपासात अडथळा येऊ नये, म्हणून याचिका मागे घेत आहे असे सांगा. माझ्या छोट्या भावाप्रमाणे आहात. मला हे मान्य आहे. माझ्याकडून चूक झाली होती. मी विश्वासात घ्यायला हवे होते. माझी चूक म्हणून पदरात पाडून घ्या, असे म्हणत वकील माफी मागत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.