उद्घाटन होऊनही परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम अपूर्णच - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:03 IST2021-02-06T05:03:09+5:302021-02-06T05:03:09+5:30
अंबाजोगाई : गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या आणि चार वेळा उद्घाटन झालेल्या अंबाजोगाई-परळी रस्त्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. वर्षभरापासून ...

उद्घाटन होऊनही परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम अपूर्णच - A
अंबाजोगाई : गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या आणि चार वेळा उद्घाटन झालेल्या अंबाजोगाई-परळी रस्त्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. वर्षभरापासून कामाला गती नसल्याने व जागोजागी अर्धवट कामे करून ठेवले गेल्याने खड्डे व धुळीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
परळीतून अंबाजोगाई, लातूर, कळंबकडे जाणारा हा मोठ्या रहदारीचा हा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. महामार्ग क्रमांक ५४८ ब मध्ये या मार्गाचा समावेश झाल्यानंतर या मार्गाचे रुंदीकरण व सिमेंटमध्ये बांधकामासाठी २०१७ मध्ये केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने निविदा काढल्या. ऑक्टोबर २०१७ मध्ये कंत्राटदार कंपनीने परळी-अंबाजोगाई या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. एका बाजूने रस्ता ठेवून दुसऱ्या बाजूने काम सुरू करण्याऐवजी एकाचवेळी पूर्वीचा डांबरी रस्ता खोदून दोन्ही बाजूने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. सुमारे अठरा किलोमीटर लांबीचा हा रस्ता जागोजागी खोदून ठेवल्याने या मार्गाने ये-जा करणाऱ्यांची व रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. उखडलेला रस्ता, खड्डे, खडी, मुरूम, वाहनांच्या वर्दळीने उडणारी धूळ आणि पावसाळ्यात चिखल यामुळे काम सुरू झाल्यानंतर सलग तीन वर्षे वाहनचालकांना तसेच रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर धनंजय मुंडे यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद व सामाजिक न्याय खाते आल्यानंतर त्यांनी या रस्त्याच्या कामात लक्ष घातले. दरम्यान, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न केल्याबद्दल जुन्या कंत्राटदाराकडून या रस्त्याचे काम काढून घेऊन पुन्हा नव्याने निविदा मागवण्यात आल्या. औरंगाबाद येथील कंत्राटदार कंपनीला ९९.९९ कोटी रुपयांस हे काम देण्यात आले. २५ जानेवारी २०२० ला चौथ्यांदा या कामाचे उद्घाटन पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार संजय दौंड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. उद्घाटन होऊनही रस्त्याचे काम पुढे अनेक महिने सुरू झाले नाही. त्यानंतर गेल्या मे, जूनमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. काम सुरू होऊनही नऊ महिने होत आले आहेत. तरीही या मार्गाच्या एका बाजूचेही काम पूर्ण झालेले नाही. जागोजागी थोडे थोडे काम करून मध्येच सोडून दिलेले आहे.
गेल्या जुलैमध्ये परळीतून प्रत्यक्ष सिमेंटमध्ये रस्त्याचे बांधकाम करण्यास सुरुवात झाली. शंकर पार्वती नगरपर्यंत एक बाजू केल्यानंतर पुन्हा सहा महिन्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम गुत्तेदाराने सुरू केले. या मार्गावर पिंपळ्यापर्यंत जागोजाग थोडे-थोडे काम करून ठेवले आहे. १८.५० किलोमीटर रस्त्याचे हे काम असून रस्त्याचे संपूर्ण चौपदरी काम सिमेंटमध्ये केले जाणार आहे. गावभागातून चौपदरी काम होणार असून दोन्ही बाजूने दुचाकी वाहनांसाठी दीड मीटरचा स्वतंत्र रस्ता असणार आहे. शिवाय दुभाजक, पथदिवे, सिमेंट काँक्रिटची गटारे, पूल, बस थांबे व इतर सुविधा असणार आहेत. अठरा महिन्यांची कालमर्यादा संबंधित काम करणाऱ्या कंपनीला शासनाने घालून दिली आहे. परळीतून कन्हेरवाडीपर्यंत या मार्गाला चौपदरीकरण करण्यास नुकतीच मान्यता दिली आहे.