दोषी आढळूनही सरपंच, ग्रामसेवकाची विस्तार अधिकाऱ्यांकडून पाठराखण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:26 IST2021-06-02T04:26:00+5:302021-06-02T04:26:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : तालुक्यातील उमरी ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीत सरपंच, ग्रामसेवक दोषी आढळले आहेत. तरी ...

दोषी आढळूनही सरपंच, ग्रामसेवकाची विस्तार अधिकाऱ्यांकडून पाठराखण
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यातील उमरी ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीत सरपंच, ग्रामसेवक दोषी आढळले आहेत. तरी या प्रकरणाचा वरिष्ठांना चौकशी अहवाल देण्यास विस्तार अधिकारी दिरंगाई करून दोषींची पाठराखण करीत आहेत. या विस्तार अधिकाऱ्यांवरच कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे.
उमरी ग्रामपंचायतीच्या एक वर्षापासून नियमित मासिक बैठका न घेणाऱ्या ग्रामसेवकाला निलंबित करा व सरपंचाला बडतर्फ करावे, अशी मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे २९ जुलै २०२० रोजी एका अर्जाव्दारे केली होती. या तक्रारीची चौकशी विस्तार अधिकारी रामचंद्र रोडेवाड यांनी केली होती. या चौकशीत तत्कालीन ग्रामसेवक दोषी आढळला होता म्हणून त्यांची बदली केली होती. सरपंचांवर काहीच कारवाई झाली नाही. यात विस्तार अधिकारी रोडेवाड यांनी सरपंच, ग्रामसेवक यांची पाठराखण केली. तर पुन्हा दुसरा ग्रामसेवक येऊन सात महिने झाले आहेत. त्यांनीही मासिक बैठक न घेता कामे सुरू केली आहेत. विकासकामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा, यासंबंधी २२ जानेवारी २०२१ रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे पुन्हा तक्रार केली. या कामांची चौकशी विस्तार अधिकारी रोडेवाड यांनी ५ मार्च रोजी केली होती. या चौकशीत ग्रामसेवक, अभियंता, सरपंच दोषी आढळले होते. याचा चौकशी अहवाल अजून दिला नाही. तरी या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची करवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य वैजनाथ घायतिडक, अविनाश दीक्षित, मंजेश शिंदे, सुरेखा इनामकर, छाया दीक्षित यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
....
एका वर्षात दोन तक्रारी, एक स्मरणपत्र देऊन विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी संबंधितांची पाठराखण करत आहेत. माझ्यासह पाच ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरून चौकशी करून सरपंच, ग्रामसेवक, अभियंता यांच्यावर कारवाईसाठी मागणी केली आहे.
- अविनाश दीक्षित, ग्रामपंचायत सदस्य, उमरी
....
ग्रामपंचायत सदस्यांच्या तक्रारीवरून आम्ही चौकशी केली. त्यानंतर पाच दिवसांनी कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याने अहवाल देण्यास उशीर झाला. दोन दिवसात वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात येईल.
- रामचंद्र रोडेवाड, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, माजलगाव