बांधावर जाऊन शेतकऱ्यांना पेरणीचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST2021-06-02T04:25:57+5:302021-06-02T04:25:57+5:30
गेवराई : पिकांची पेरणी करताना रुंद वरंबा पद्धत तंत्रज्ञानाचा उपयोग कशाप्रकारे करावा, याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. गेवराई ...

बांधावर जाऊन शेतकऱ्यांना पेरणीचे प्रात्यक्षिक
गेवराई : पिकांची पेरणी करताना रुंद वरंबा पद्धत तंत्रज्ञानाचा उपयोग कशाप्रकारे करावा, याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले.
गेवराई :
मान्सूनचे आगमन आठवड्यावर येऊन ठेपले आहे. दरम्यान, गेवराई कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बांधावर जाऊन पीक पेरणी, लागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येत आहेत. मंगळवारी मादळमोही कृषी मंडळातील काही गावांत रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने यंत्राद्वारे पेरणी व लागवड केल्यानंतर उत्पादनात होणारे फायदे याविषयी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले. शेतकऱ्यांनी अशाप्रकारे उपयुक्त तंत्रज्ञानाचा उपयोग करत पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.
मादळमोही मंडळातील लोळदगावसह काही गावात मंगळवारी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पेरणी, लागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. मंडळ कृषी अधिकारी हर्षवर्धन खेडकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका व हरभरा या पिकास रुंद वरंबा या पद्धतीने यंत्राद्वारे पेरणी केल्यास पिकास उपयुक्त आहे. बी.बी.एफ.पद्धतीने बियाणे, खते या निविष्ठा खर्चात २० ते २५ टक्के बचत होते, शिवाय उत्पन्नामध्ये २५ ते ३० टक्के वाढ होते. बी.बी.एफ.पेरणी यंत्राच्या सहाय्याने उतारास आडवी पेरणी केल्याने मुलस्थानी जलसंधारण साधले जाते, तसेच पर्जन्यमान खंडाच्या कालावधीत पाण्याच्या ताणाची तीव्रता कमी होते. त्याचबरोबर जास्त पर्जन्यमान झाल्यास अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास मदत होते.
पिकास मुबलक हवा, सूर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होते. पिकामध्ये आंतरमशागत करणे, उभ्या पिकात सरीमधून ट्रॅक्टर मनुष्यचलीत फवारणी यंत्राद्वारे कीटकनाशक फवारणी करणे सोईचे आहे. जमिनीच्या धूपीस प्रतिबंध, जमिनीची सच्छीद्रता वाढून जमीन भुसभुशीत होत असल्याने या रुंद वरंबा पद्धतीने यंत्राद्वारे या उपयुक्त तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी करावी, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले. यावेळी कृषी पर्यवेक्षक व्ही. डी. जाधव, आर. व्ही. सांगळे, कृषी सहायक महेश बोरुडे, मोहोळकर, पेजगुडे, सानप, पठाडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===Photopath===
010621\img-20210601-wa0406_14.jpg