फळांना मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:29 IST2021-04-05T04:29:59+5:302021-04-05T04:29:59+5:30
ग्रामपंचायतीकडून मार्गदर्शन अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी कोरोना ...

फळांना मागणी वाढली
ग्रामपंचायतीकडून मार्गदर्शन
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी कोरोना संसर्गापासून बचाव कसा करायचा? काय काळजी घ्यायची? कोरोनाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. याबाबत गावचे ग्रामसेवक, तलाठी यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. कोरोनाची वाढती साखळी रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना सांगितल्या जात आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी संदीप घोणशीकर यांनी दिली.
पाण्याचा अपव्यय
अंबाजोगाई : शहरात अनेक भागांत पाणी मुबलक प्रमाणात मिळत आहे. उन्हाळ्यातही पाणी टंचाई भासत नाही. त्याची नागरिकांना किंमत नसल्यासारखे झाले आहे. ज्यावेळी पाणीपुरवठा सुरू असतो. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. नागरिक आपले पाणी भरणे झाल्यानंतर नळ बंद ठेवत नसल्याने ते पाणी वाहून जाते. परिणामी, पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. नागिरकांनी पाणीबचतीचे महत्त्व समजून घेऊन पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन पर्यावरण मित्रांनी केले आहे.
बंदचा रिक्षा व्यवसायाला फटका
अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात गेल्या लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प आहेत. या लॉकडाऊनच्या कालावधीत बससेवा बंद राहिली. याचा परिणाम म्हणून रिक्षा चालकांना बेरोजगार व्हावे लागले. सकाळी सात ते दुपारी एक या कालावधीतच सर्व व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांचा व्यवसायही होत नाही. तर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकही रिक्षात बसायला तयार नाहीत. यामुळे रिक्षा चालकांचा व्यवसाय संकटात सापडला आहे.
वृद्ध कलावंतांना मानधन द्या
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात वृद्ध कलावंतांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा वृद्ध कलावंतांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मानधन सुरू करण्यात आले आहे. ज्यांना ही योजना लागू आहे. अशा कलावंतांचे माानधन अनेक महिन्यांपासून रखडले आहे. तर ज्या नवीन कलावंतांनी आपले प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यांच्या प्रस्तावांना अजूनही मंजुरी मिळाली नाही. अशा कलावंतांना तात्काळ मानधन सुरू करा, अशी मागणी अंबाजोगाई येथील ज्येष्ठ कलावंत उल्हास पांडे यांनी केली आहे.