पाणंद रस्त्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:26 IST2021-02-05T08:26:16+5:302021-02-05T08:26:16+5:30
गस्त वाढवावी वडवणी : वडवणीसह तालुक्यातील ग्रामीण भागात काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अंधाराचा फायदा घेत ...

पाणंद रस्त्याची मागणी
गस्त वाढवावी
वडवणी : वडवणीसह तालुक्यातील ग्रामीण भागात काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अंधाराचा फायदा घेत होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. परंतु, अद्यापही याकडे दुर्लक्ष होत आहे.
बंधारा दुरुस्ती करावी
अंबाजोगाई : तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे कोल्हापुरी बंधारे व नद्यांवरील बंधारे मोठ्या प्रमाणात खचले आहेत,तर मोठ्या पावसामुळे अनेक ठिकाणचे बंधारे वाहून गेले आहेत. शासनाने बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी आहे.
रॉकेलचा गैरवापर
गेवराई : गरिबांसाठी स्वस्त धान्य दुकानांवरील रॉकेल काळ्या बाजारात जात असून, त्याचा वापर वाहनांसाठी केला जात आहे. यामुळे प्रदूषण वाढत आहे, तर दुसरीकडे शिधापत्रिकाधारकांना रॉकेल मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. परंतु महसूलकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
खराब रस्त्यांमुळे वाहने खिळखिळी
अंबाजोगाई : तालुक्यात पिंपळा ते यशवंतराव चौक, लोखंडी सावरगाव ते केज या रस्त्यांचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरूच आहे. कामे करण्यासाठी ठिकठिकाणी रस्ते उखडून ठेवले आहेत, तर अनेक ठिकाणी रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने आदळून आदळून दुचाकी व चारचाकी गाड्या खिळखिळ्या झाल्या आहेत. गाड्यांबरोबरच माणसांची अवस्था तशीच होऊ लागली आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.
वीज तारांचा धोका
माजलगाव : गढी मार्गावरील विद्युत तारा जमिनीलगत लोंबकळत आहेत. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. वीज तारा ताणण्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. दुरुस्तीची कामे अनेक दिवसांपासून रखडलेली आहेत. ही रखडलेली कामे पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
महामार्गाचे काम अपूर्ण
नेकनूर : बीड तालुक्यातील नेकनूरमार्गे मांजरसुंबा ते केज या राज्य महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. त्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्याकडेला असलेल्या साहित्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे अनेकवेळा महामार्गावरील अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मागणी आहे.