इनामी जमिनीच्या बनावट दस्तऐवजप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:17 IST2020-12-28T04:17:43+5:302020-12-28T04:17:43+5:30
आष्टी : आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील शेख महंमद दर्गाह देवस्थानची इनामी जमीन बनावट दस्तावेज तयार करून हडपण्यात आली असून ...

इनामी जमिनीच्या बनावट दस्तऐवजप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी
आष्टी : आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील शेख महंमद दर्गाह देवस्थानची इनामी जमीन बनावट दस्तावेज तयार करून हडपण्यात आली असून या प्रकरणात संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करून देवस्थानची इनामी जमीन पूर्ववत हस्तांतरित करण्याची मागणी मूळ वारसदारांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदारांमार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, अल्पसंख्याक विकास मंत्रालय, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य तथा पालकमंत्री आणि विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.
आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील ईनाम जमीन सर्व्हे नंबर ७५, ७६, ७७, ८१, ८१/१ एकूण क्षेत्र १०० एकर जमीन बनावटी, खोटे सही दस्तावेज तयार करून जमीन हस्तांतरण करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. हस्तांतरण करणाऱ्या महसूल प्रशासनातील अधिकारी व जमीन खरेदी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही जमीन वंशपरंपरागत इनामी देवस्थानच्या नावावर असून देवस्थानची सेवा करत आहोत. संबंधित जमीन आमच्या नावावर असल्याचे पुरावे आहेत. मात्र, या जमिनीवर बेकायदेशीररीत्या खोटे दस्तावेज तयार करून आदिनाथ त्रिंबक बोडखे, सुरेश गहिनीनाथ बोडखे, गोपीनाथ पांडुरंग बोडखे, शेख मुस्ताक बादशाह यांनी नावावर करून घेतल्याची तक्रार निवेदनात केली आहे. खोटे बनावट सह्या आदी दस्तावेज तयार करून शेतकरी नसलेल्या एका शिक्षणसंस्थेत मुख्याध्यापक, प्राध्यापक आहेत. त्यांचा जमिनीशी काहीही संबंध नसताना मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याशी संगनमताने फसवणूक केल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शेख अन्नेश बाबूलाल, शेख चांद महंमद, शेख दस्तगीर महंमद, शेख हजरत महंमद, शेख गुलाब अहंमद, शेख हिना अन्नेश आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.