वसंतराव नाईक तांडा योजनेचे अध्यक्षपद देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST2021-03-21T04:32:03+5:302021-03-21T04:32:03+5:30
बीड जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये बंजारा समाजाला डावलून अन्याय केला आहे. बंजारा समाजावर झालेला अन्याय दूर ...

वसंतराव नाईक तांडा योजनेचे अध्यक्षपद देण्याची मागणी
बीड जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये बंजारा समाजाला डावलून अन्याय केला आहे. बंजारा समाजावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या अध्यक्षपदाची निवड तत्काळ करून बंजारा समाजाला या योजनेचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी गोर सेना प्रदेशाध्यक्ष संपत चव्हाण यांनी केली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकासाचा आराखडा तयार केला जातो. भटक्या असलेल्या समाजाला सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी समस्येची जाणीव असलेल्या प्रतिनिधीला जिल्हा नियोजन समिती प्रतिनिधित्व देणे आवश्यक होते. मात्र नुकत्याच जिल्हा नियोजन समिती निवडण्यात आली परंतु बंजारा समाजाच्या एकाही व्यक्तीला स्थान देण्यात आलेले नाही. बीड जिल्ह्यात बंजारा समाजाचे निर्णायक मतदान आहे. निवडणुकीच्या दरम्यान ओबीसीच्या नावाखाली बंजारा समाजाला सतत खोटी आश्वासने देण्यात आली. विधानसभा निवडणुकीत बंजारा समाजाने महाराष्ट्रात निर्णायक मतदान केले आहे. असे असताना राज्याच्या मंत्री मंडळात एकही बंजारा समाजाचा मंत्री नाही. त्यामुळे बंजारा समाजाची सत्ताधाऱ्याविरोधात नाराजी वाढत आहे.
बीड जिल्ह्यातही पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सत्ताधारी आमदारांना विजयी करण्यात बंजारा समाजाने सिंहाचा वाटा उचलला आहे. जिल्हा नियोजन समितीत एकाही बंजारा समाजाला स्थान देण्यात आलेले नाही. बंजारा समाजावर झालेल्या अन्याय दूर करण्यासाठी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या अध्यक्षांची निवड तत्काळ करावी व बंजारा समाजाला या समितीचे अध्यक्षपद द्यावे जेणेकरून बंजारा समाजाला न्याय मिळेल, अशी मागणी संपत चव्हाण यांनी केली आहे.