धुलीवंदनाच्या दिवशी 'या' गावात काढतात जावयाची गाढवावरून मिरवणूक; आहे ९० वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 05:25 PM2020-03-12T17:25:11+5:302020-03-12T17:28:07+5:30

ग्रामस्थांना शोध मोहीम राबवून जावयास शोधून आणून गाढवावर बसवून त्यांची मिरवणूक काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात. 

On the day of Dhulivandan, a procession of donkeys is to be taken to this village; Is a 90 year tradition | धुलीवंदनाच्या दिवशी 'या' गावात काढतात जावयाची गाढवावरून मिरवणूक; आहे ९० वर्षांची परंपरा

धुलीवंदनाच्या दिवशी 'या' गावात काढतात जावयाची गाढवावरून मिरवणूक; आहे ९० वर्षांची परंपरा

Next
ठळक मुद्देमस्साजोगचे दत्तात्रय गायकवाड गर्दभस्वारीचे ठरले मानकरीधूलिवंदनाच्या एक दिवस अगोदर गावातून जावई होतात भूमिगत .

- दीपक नाईकवाडे / विनोद ढोबळे 

विडा (जि.बीड) : केज तालुक्यातील विडा येथे धूलिवंदनाच्या दिवशी जावयास गाढवावरून मिरवण्याची गेल्या ९० वर्षांपासूनची परंपरा आहे. मस्साजोग येथील रहिवासी असलेले आणि विडा येथील साहेबराव पवार यांचे जावई दत्तात्रय गायकवाड हे यावर्षीच्या धूलिवंदनाचे मानकरी ठरले. मंगळवारी सकाळी त्यांना मस्साजोग येथे विडा ग्रामस्थांनी पकडल्यानंतर त्यांची मोठ्या जल्लोषात गाढवावरुन मिरवणूक काढण्यात आली.
गेल्या ९० वर्षांपूर्वी विडा येथे धुळवडीच्या दिवशी चेष्टा मस्करीतून गावचे ठाकूर यांनी त्यांच्या जावयाची गाढवावरून वाजत गाजत मिरवणूक काढली होती. 

ही मिरवणूक त्यानंतर गावची परंपरा बनली. ती आजही कायम चालू आहे. विडा गावात शंभरावर जावई आहेत. मात्र ते धूलिवंदनाच्या एक दिवस अगोदर गावातून भूमिगत होतात. त्यामुळे ग्रामस्थांना शोध मोहीम राबवून जावयास शोधून आणून गाढवावर बसवून त्यांची मिरवणूक काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात. यावर्षी विडा येथील साहेबराव पवार यांचे जावई व मस्साजोग येथील रहिवासी असलेले दत्तात्रय गायकवाड यांना उत्सव समितीच्या सदस्यांनी मस्साजोग येथे सकाळी ७ वा. पकडले व गावात आणले. त्यांना गाढवावर बसविण्यात आले. व  ग्रामपंचायत कार्यालयापासून मिरवणुकीला वाजतगाजत सुरुवात करण्यात आली. गाढवावरील जावायाची मिरवणूक गावात मिरवल्यानंतर सांगता सकाळी ११.३० वाजता हनुमान मंदिराजवळ करण्यात आली. यावेळी जावई दत्तात्रय गायकवाड यांना उत्सव समितीतर्फे गावचे सरपंच भैरवनाथ काळे, पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे यांच्या हस्ते कपड्याचा आहेर करीत सन्मानित केले. ही मिरवणूक पाहण्यासाठी गावातील महिला पुरुषांसह युवकांनी मोठी गर्दी केली होती.

गावात आले आणि सापडले
विडा येथील गर्दभ मिरवणुकीपासून वाचण्यासाठी दत्तात्रय गायकवाड हे दोन दिवस शेतात मुक्कामी थांबले होते. मात्र धूलिवंदनाच्या दिवशी सकाळी ७ वा. ते मस्साजोग बसस्थानकावर आले असता त्यांना उत्सव समितीच्या शहाजी गुटे, उपसरपंच बी. आर. देशमुख, लहू घोरपडे, सूरज पटाईत, अविनाश सिरसाट, गोविंद देशमुख या पदाधिकाऱ्यांनी पकडले. नंतर त्यांना विडा येथे जीपमधून आणून त्यांची गर्दभ मिरवणूक काढण्यात आली.

Web Title: On the day of Dhulivandan, a procession of donkeys is to be taken to this village; Is a 90 year tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.