संततधार पावसामुळे उडीद पिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:35 IST2021-08-23T04:35:40+5:302021-08-23T04:35:40+5:30
आष्टी : तालुक्यात सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने पिके जोमाने आली. मात्र, ऐन फळधारणेच्या वेळेत ओढ दिल्याने उडीदाचे पीक ...

संततधार पावसामुळे उडीद पिकाचे नुकसान
आष्टी : तालुक्यात सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने पिके जोमाने आली. मात्र, ऐन फळधारणेच्या वेळेत ओढ दिल्याने उडीदाचे पीक करपू लागले होते. आता काढणीला सुरुवात करायची तोच मागील पाच ते सहा दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या उडीद पिकाच्या शेंगा कुजून गळू लागल्या आहेत.
तालुक्यात होत असलेल्या संततधार पावसाने मूग, उडीद या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. काही भागात मूग, उडीदाच्या शेंगा पावसाअभावी थोड्या फार प्रमाणात आल्याचे चित्र आहे. परंतु, सततच्या पावसाने पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी शेंगांना कीड लागली आहे. पावसाच्या पाण्याने शेंगा सडत असल्याचे चित्र आहे. कापसावरही मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. सततच्या पावसाने झाडांची खालील पाने लालसर, पिवळी पडत असून, गळत आहेत. पावसाने दडी दिल्यानंतर पाऊस कधी पडेल म्हणून चिंतेत असलेला बळिराजा सततच्या पावसाने संकटात सापडला आहे. सततच्या पावसाने काढणीला थोड्या फार प्रमाणात आलेली पिकेदेखील हातातून जाण्याच्या भीतीने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
चौकट -
‘थांब रे पावसा’ म्हणण्याची वेळ
आष्टी तालुक्यातील उडीद, मूग पिकांना अक्षरशः मोड फुटल्याचे दिसून येते. उडीद पीक यावर्षी थोड्या फार प्रमाणात असून, सततच्या संततधार पावसाने काढणी करता येत नाही; मात्र पावसाने विश्रांती घेतली नाही तर हातात येणारे पीक डोळ्यांसमोर पूर्णपणे नुकसान होईल. ‘थांब रे पावसा’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
सरसकट पंचनामे करून भरपाई द्या
अगोदरच मोठ्या प्रमाणावर उत्पन्नात घट झाली आहे. फळधारणेत पावसाअभावी व काढणीत पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पीक पाहणी करून मूग, उडीद, आदी पिकांचे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई द्यावी.
- रघुनाथ शिंदे, शेतकरी, आष्टी.
220821\img-20210822-wa0553_14.jpg