नोकरी मिळत नसल्याने डीएड तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:32 IST2020-12-29T04:32:26+5:302020-12-29T04:32:26+5:30
धारूर : डीएडचे शिक्षण पूर्ण करूनही नोकरी मिळत नसल्याने ३२ वर्षीय सुशिक्षित बेरोजगार तरुणाने राहत्या घरी गळफास ...

नोकरी मिळत नसल्याने डीएड तरुणाची आत्महत्या
धारूर : डीएडचे शिक्षण पूर्ण करूनही नोकरी मिळत नसल्याने ३२ वर्षीय सुशिक्षित बेरोजगार तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धारूर तालुक्यातील आसरडोह येथे २७ डिसेंबर रोजी रविवारी सकाळी घडली. बाळासाहेब ज्ञानदेव काजगुंडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
बारावीनंतर डीएड अन् शिक्षक म्हणून नोकरी पक्की असे चित्र काही दिवसांपूर्वी होते. त्यामुळे धारूर तालुक्यातील आसरडोह येथील बाळासाहेब काजगुंडे याने डीएड पूर्ण केले; पण काही वर्षांपासून शासनाने डीएडच्या जागाच न भरल्याने अनेक तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. शिक्षण घेऊनही नोकरी लागत नसल्याने आणि काही काम करता येत नाही या नैराश्येतून बाळासाहेब काजगुंडे याने रविवारी सकाळी राहत्या घरात माळवदाच्या हळकडीला (हूक) दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आडस येथील पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पो.कॉ. तेजस ओव्हाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. धारूर येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. बाळासाहेब काजगुंडे यांच्या कुटुंबात आई-वडील, दोन विवाहित भाऊ, असा परिवार आहे.