वीज जाताच सीटीस्कॅन मशीन पडते बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST2021-03-21T04:32:42+5:302021-03-21T04:32:42+5:30
बीड : जिल्हा रुग्णालयातील पर्यायी विजेचा प्रश्न आजही जैसे थे आहे. वीज गायब होताच अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत ...

वीज जाताच सीटीस्कॅन मशीन पडते बंद
बीड : जिल्हा रुग्णालयातील पर्यायी विजेचा प्रश्न आजही जैसे थे आहे. वीज गायब होताच अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सीटी स्कॅन मशीनही बंद पडते. त्यामुळे रुग्णांचे हाल होतात. ही अडचण दूर करण्यासाठी येथे ८० ते १०० के.व्ही.चे जनरेटर उपलब्ध करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
जिल्हा रुग्णालयात साधारण दीड कोटी रुपयांची सीटी स्कॅन मशीन बसविण्यात आली. दीड ते दोन वर्षांपासून ती सामान्य रुग्णांच्या सेवेत आहे. कोरोना काळात तर रोज ५० ते ६० रुग्णांचे नियमित सीटीस्कॅन केले जात आहे. परंतु, एखाद्यावेळी रुग्ण मशीनवर असताना वीज गायब होते. तेव्हा मोठा आवाज होऊन मशीन हादरते. तसेच अंधार होतो. त्यामुळे एखादा बीपीचा अथवा गंभीर आजाराचा रुग्ण घाबरण्याची दाट शक्यता असते. असाच प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला. केवळ वीज नसल्याने एका रुग्णाचे २४ तासांनंतर सीटी स्कॅन करण्यात आले.
दरम्यान, ही अडचण दूर करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पर्यायी विजेची व्यवस्था करणे आवश्यक आहे. सीटीस्कॅन मशीनसाठी किमान ८० ते १०० के.व्ही.चे जनरेटर उपलब्ध करून देण्याची गरज आहे. याबाबत या विभागाकडून पत्रव्यवहारही करण्यात आलेला आहे; परंतु अद्याप ते मिळाले नसल्याने सामान्यांना आणि येथील कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
कोट-
सीटीस्कॅन मशीनसाठी स्वतंत्र जनरेटरची मागणी केलेली आहे. ते लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. सामान्यांचे हाल होणार नाहीत, याची पूर्ण काळजी घेतली जात आहे.
डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड