वैद्यनाथच्या महाशिवरात्री यात्रेवर कोरोनाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:32 IST2021-03-06T04:32:14+5:302021-03-06T04:32:14+5:30
परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथ मंदिरात ११ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या अनुषंगाने दर्शनव्यवस्था ...

वैद्यनाथच्या महाशिवरात्री यात्रेवर कोरोनाचे संकट
परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथ मंदिरात ११ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या अनुषंगाने दर्शनव्यवस्था व शहरातील स्वच्छता, पथदिवे व अन्य सुविधेच्या पूर्वतयारीचा आढावा गुरुवारी अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महाशिवरात्री उत्सवाची प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. परंतु, शासनाच्या आदेशानुसार पुढील नियोजन करण्यात येणार आहे.
पारंपरिक पद्धतीने ११ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी श्री वैद्यनाथाचे दर्शन, सायंकाळी जिल्हाधिकारी बीड यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. त्यानंतर दोन दिवसांनी श्री वैद्यनाथाचा पालखी सोहळा होणार आहे. यासंदर्भात मात्र अद्यापही नियोजन कसे असावे, याविषयी शासनाकडून निर्णय आलेला नाही, अशी माहिती श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली. ४ मार्च रोजी येथील वैद्यनाथ मंदिरात अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी बीड यांच्या उपस्थितीत झालेल्या सूचनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी परळीचे तहसीलदार, वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश शेजुळ, वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी राजेश देशमुख व सर्व विश्वस्त, परळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे, नपचे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे, परळीचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम, संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, परळी विद्युत केंद्राचे अधीक्षक अभियंता सुनील होलंबे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संजय मुंडे, अन्न व भेसळ प्रशासन अधिकारी उपस्थित होते.
दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी महाराष्ट्र आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात येथून भाविक श्री प्रभू वैद्यनाथाचे दर्शनासाठी येतात व येथे आठ दिवस यात्रा भरते. परंतु, यंदा कोरोनाचे सावट असल्याने शहरात महाशिवरात्र महोत्सवानिमित्त विविध होणाऱ्या कार्यक्रमावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी नगरपरिषदेच्या वतीने कुस्त्याचे फड लावले जातात. अश्व स्पर्धा, पशुप्रदर्शन, कृषी प्रदर्शन भरविले जाते तसेच मीना बाजार, राहटपाळणे उभारले जातात. परंतु यावर्षी हे कार्यक्रम होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
परळी येथील वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्रीच्या अनुषंगाने पायऱ्यावर लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले होते.