माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक सुरेश साबळे विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:14 IST2018-03-17T00:13:57+5:302018-03-17T00:14:27+5:30
माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश साबळे यांनी त्यांच्या राहत्या घराच्यामागे बाळासाहेब सोपान पौळ यांच्या प्लॉटमध्ये अतिक्रमण केले. त्यांना गुंडामार्फत धमक्या देत जातीवाचाक शिवीगाळ केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून माजलगाव शहर पोलिसात शुक्रवारी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक सुरेश साबळे विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश साबळे यांनी त्यांच्या राहत्या घराच्यामागे बाळासाहेब सोपान पौळ यांच्या प्लॉटमध्ये अतिक्रमण केले. त्यांना गुंडामार्फत धमक्या देत जातीवाचाक शिवीगाळ केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून माजलगाव शहर पोलिसात शुक्रवारी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
शहरापासून जवळच असलेल्या खानापुर येथील बाळासाहेब सोपानराव पौळ यांचे राहते घर आहे. त्यांच्या समोरील भागात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश साबळे यांचे हॉस्पिटल आणि घर आहे. पौळ हे अनुसूचित जातीचे असल्याने त्यांच्यावर १४ डिसेंबर २०१७ पासून १५ जानेवारी २०१८ पर्यंत वेळोवेळी अन्याय करण्यात येत होता. यातून पौळ यांनी त्यांचे राहते घर विक्री करावे, या हेतूने हा त्रास देण्यात येत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. याठिकाणी पौळ यांचे १३ व १४ नंबरचे प्लॉट असून त्यापैकी १३ नं. प्लॉटवर अतिक्रमण केले होते. पौळ आपणास प्लॉट देत नसल्याने वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. साबळे यांच्या रुग्णालयातील शस्त्रक्रियेनंतर निघालेली घाण, खराब पाणी व इतर औषधी साहित्य पौळ यांच्या प्लॉटमध्ये टाकले जात होते.
याविषयी पौळ यांनी त्यांना विचारणा केली असता गुंडांना सोबत घेऊन डॉ. साबळे यांनी घरात घुसून लाथाबुक्क्याने मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
यावरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही डॉ. साबळेवर कसल्याही प्रकारचा गुन्हा नोंदविला नाही. म्हणून फिर्यादी पौळ यांनी न्यायालयात धाव घेतली. १५ मार्च २०१८ रोजी अप्पर सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार डॉ. साबळे यांच्या विरुद्ध भादवी कलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ चे कलम ३(२)(४)(५)(१०)(१५) भादवीचे कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६, न्यायालय आदेशाने १५६(३)सी आर पी सी प्रमाणे शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटके या करत आहेत.