‘उत्सवातून आपुलकीचे अतूट नाते निर्माण करा’

By Admin | Updated: September 16, 2015 12:02 IST2015-09-16T00:01:20+5:302015-09-16T12:02:07+5:30

गणेशोत्सवातून सामाजिक उपक्रम राबविले पाहिजेत. उत्सवांकडे मौजमजा नव्हे, तर सामाजिक एकता जोपासण्याचे माध्यम म्हणून पहा,

'Create a Liaquatous Relationship Fest' | ‘उत्सवातून आपुलकीचे अतूट नाते निर्माण करा’

‘उत्सवातून आपुलकीचे अतूट नाते निर्माण करा’


बीड : गणेशोत्सवातून सामाजिक उपक्रम राबविले पाहिजेत. उत्सवांकडे मौजमजा नव्हे, तर सामाजिक एकता जोपासण्याचे माध्यम म्हणून पहा, असा संदेश औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिला. प्रेमाचा संवाद व आपुलकीचे नाते निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मंगळवारी येथे जिल्हा पोलीस प्रशासनाने आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘जातीय सलोखा’ हा कार्यक्रम घेतला. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अधीक्षक अनिल पारसकर, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, माजी आ. राजेंद्र जगताप, अ‍ॅड. शेख शफीक, सय्यद नवीदुज्जमा, विविध धर्मीय गुरू यांची मंचावर उपस्थिती होती.
नांगरे पाटील म्हणाले, आमच्या लहानपणी गणेश मंडळातर्फे पुस्तकांचे वाटप व्हायचे. या पुस्तकांमुळेच आम्ही घडलो. अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. उत्सवावर दुष्काळी सावट आहे. दरवर्षी २० हजार कोटी रूपये खर्च होतो. काही प्रमाणात पर्यावरणालाही बाधा पोहोचते. त्यामुळे सदसद् विवेकबुध्दीने कामे करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बाप्पा विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या आगमनाने विघ्न संपुष्टात यावेत, यासाठी प्रत्येकाने सामाजिक, जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधून दीर्घकालीन उपायांची गरज असल्याचे सांगितले. विविध धर्मगुरूंनीही मते मांडली. अधीक्षक अनिल पारसकर यांनी प्रास्ताविक केले. अभिनेता अक्षयकुमारने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पाठविलेल्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'Create a Liaquatous Relationship Fest'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.