महागाईविरोधात अंबाजोगाईत माकपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:24 IST2021-06-18T04:24:02+5:302021-06-18T04:24:02+5:30
अंबाजोगाई : सरकारच्या जनताविरोधी धोरणाच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीतर्फे पुकारण्यात आलेल्या देशभर निदर्शने आंदोलनांतर्गत अंबाजोगाईत उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात ...

महागाईविरोधात अंबाजोगाईत माकपची निदर्शने
अंबाजोगाई : सरकारच्या जनताविरोधी धोरणाच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीतर्फे पुकारण्यात आलेल्या देशभर निदर्शने आंदोलनांतर्गत अंबाजोगाईत उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सत्तारूढ झाल्यानंतर मात्र सर्वसामान्य जनतेचे पेट्रोल ,डिझेलची भाववाढ करून कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेलने शंभरी गाठली आहे. या भाववाढीचा सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर परिणाम होऊन त्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. खाद्यतेलाचे भाव २०० रुपयांच्या घरात जाऊन पोहोचले आहेत.
यामुळे गरीब, कष्टकरी जनतेला कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोणताही रोजगार उपलब्ध नव्हता, त्यातही प्रचंड महागाईमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. कॉ. बब्रुवाहन पोटभरे, कॉ. अजय बुरांडे, कॉ. प्रशांत मस्के, कॉ. सुहास चंदनशिव, कीर्ती कुंठे, धीरज वाघमारे, राहुल धोतरे, सुमित आवाडे, सचिन टिळक, जगन्नाथ पाटोळे, अशोक शेरकर, महेश देशमुख, आदींनी आंदोलनात सहभाग नोंदविला.
------
विविध मागण्यांचे निवेदन
पेट्रोल, डिझेलची भाववाढ, जीवनावश्यक वस्तूंची महागाई तत्काळ मागे घ्यावी, शेतकरी विरोधी कायदे तत्काळ मागे घ्यावेत, आशा सेविकांना आरोग्य खात्यात कायम नेमणूक द्यावी तसेच किमान वेतन तत्काळ द्यावे, बांधकाम कामगारांचे नोंदणी कार्यालय अंबाजोगाई येथे सुरू करावे. अस्मिता ओहाळच्या अट्राॅसिटीचा पारदर्शक तपास करून तिला न्याय द्या व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या.