सर्व साधारण सभेत बोलू दिले नाही म्हणून नगरसेवकाने अंगावर ओतले रॉकेल
By Admin | Updated: August 5, 2016 19:02 IST2016-08-05T18:45:16+5:302016-08-05T19:02:56+5:30
येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी बाकावरील नगरसेवकाने अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी घडली

सर्व साधारण सभेत बोलू दिले नाही म्हणून नगरसेवकाने अंगावर ओतले रॉकेल
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. ५ : येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी बाकावरील नगरसेवकाने अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी घडली. सर्वसाधारण सभा सुरू असताना बोलू दिले नाही म्हणून हा प्रकार केल्याचे नगरसेवक खुर्शीद आलम यांनी सांगितले.
बीड नगरपालिकेत सहा महिन्यांपूर्वी सत्ताधारी पक्षातील पाच ते सहा नगरसेवकांनी बंडखोरी केली आहे. यामुळे पहिल्यांदाच बीड पालिकेची सर्वसाधारण सभा वादग्रस्तही झाली. शुक्रवारी ठरल्याप्रमाणे सभेला सुरुवात झाली. बंडखोरी केलेल्या नगरसेवकांनी शहरातील समस्येवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यास सुरुवात करताच एकच गोंधळ उडाला.
नगराध्यक्षा रत्नमाला दुधाळ मात्र या गदारोळात शांत होत्या. सत्ताधारी पक्षातील नगरसेवक व विरोधी बाकांवरील नगरसेवक यांच्यात वादविवाद सुरू झाले. दरम्यानच, खुर्शीद आलम यांनी आपल्याला बैठकीत बोलू दिले जात नाही म्हणून अंगावर रॉकेल ओतून घेतले. या घटनेमुळे गोंधळात अधिकच भर पडली. पोलिसांनी खुर्शीद यांना ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात नेले.
सभागृहात रॉकेल आले कोठून?
एरवी सर्वसामान्यांना रॉकेल मिळत नसताना बीड पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या सभागृहात रॉकेलची कॅन आली कोठून, हा प्रश्न पोलिसांसह सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. या घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक गणेश गावडे, शहर ठाण्याचे निरीक्षक एस.बी. पौळ, सहायक निरीक्षक यशवंत बारवकर, फौजदार कैलास डेरे यांनी घटनास्थळी भेट दिली.