पाचट पेटविलेल्या फडात शेतकऱ्याचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST2021-03-21T04:32:29+5:302021-03-21T04:32:29+5:30
जातेगाव : गेवराई तालुक्यातील जातेगाव शिवारात ऊस गळितास गेल्याने फडातील उसाची पाचट पेटवली होती. या फडात झोपलेल्या एका ...

पाचट पेटविलेल्या फडात शेतकऱ्याचा मृतदेह
जातेगाव : गेवराई तालुक्यातील जातेगाव शिवारात ऊस गळितास गेल्याने फडातील उसाची पाचट पेटवली होती. या फडात झोपलेल्या एका शेतकऱ्याचा जळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दहाच्यासुमारास तालुक्यातील श्रीराम वस्ती येथे घडली. हा प्रकार घातपाताचा असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता.
दिगांबर विक्रम पांढरे (वय २७) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. १९ मार्चरोजी ते गेवराई येथील रोजंदारीचे काम करून रात्री घरी आले होते. मात्र, त्यांना फोन आल्याने ते घराबाहेर पडल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. रात्रभर घरी न आलेल्या दिगांबर यांचा मृतदेह विश्वंबर जाधव यांच्या उसाच्या फडात जळालेल्या अवस्थेत आढळून आला. जाधव यांचा ऊस गळितास नुकताच गेल्यामुळे त्यांनी उसाची पाचट पेटवली होती. याच उसाच्या फडात दिगांबर पांढरे यांचा मृत्यू झाला.
दिगांबर यांच्या पश्चात्य आई, पत्नी, तीन महिन्यांचा मुलगा आहे. दिगांबर पांढरे यांच्या वडिलांचे निधन झाले असून, सर्व जबाबदारी त्यांच्यावरच असल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.
शनिवारी सकाळी जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यास मृतदेह आणला होता. हा प्रकार घातपाताचा असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. गेवराईचे पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड, तलवाडा पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे घटनास्थळी दाखल होऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन दिले.