Corona Virus : म्युकरमायकोसिस पाठोपाठ ॲस्परजीलॉसिस नवा आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 19:43 IST2021-06-12T19:34:57+5:302021-06-12T19:43:55+5:30
Corona Virus : दुसरी लाट कमी होत असतानाच म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढले.

Corona Virus : म्युकरमायकोसिस पाठोपाठ ॲस्परजीलॉसिस नवा आजार
बीड : आगोदरच कोरोनामुळे दोन वर्षांपासून सर्वच त्रस्त आहेत. त्यापाठोपाठ म्युकरमायकोसिसने डोके वर काढले. हे असतानाच आता ॲस्परजीलॉसिस या नव्या पांढऱ्या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढले आहे. बीडमध्ये याचे दोन रुग्ण निष्पन्न झाले असून अंबाजोगाईतील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत हजारो लोकांचा बळी गेला आहे. दुसरी लाट कमी होत असतानाच म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढले. जिल्ह्यात आतापर्यंतची याची रुग्णसंख्या १५० वर गेली आहे. तसेच २० जणांचा मृत्यूही झाला आहे. यावर उपाययोजना सुरू असतानाच आणखी पांढरी बुरशी असलेला ॲस्परजीलॉसिस आजार समोर आला आहे. माजलगाव व केज तालुक्यातील दोन रुग्णांना हा आजार झाला आहे. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. हा आजार म्युकरमायकोसिस एवढा घातक नसल्याचे सांगण्यात येत असले तरी नवा आजार असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कसे झाले निदान?
कोरोनाचा इतिहास असलेल्या दोन संशयितांना अंबाजोगाईत दाखल केले. येथे त्यांची सायनस इन्डोस्कोपी केली. तसेच म्युकरमायकोसिसची तपासणी केली. यात तज्ज्ञांना ॲस्परजीलॉसिस आजार असल्याचे निदान झाले. यापूर्वी या आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचेही सांगण्यात आले.
ॲस्परजीलॉसिस या आजाराची लक्षणे आणि उपचार हे म्युकरमायकोसिससारखीच आहेत. हा पांढरा बुरशीजन्य आजार आहे. सध्या दोघांवर उपचार सुरू आहेत. - डॉ. भास्कार खैरे, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई