Corona Vaccine : हद्द झाली ! आरोग्य कर्मचाऱ्याने नातेवाईकांना देण्यासाठी चोरून कोरोना लस आणली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 19:52 IST2021-06-05T19:50:54+5:302021-06-05T19:52:26+5:30
Corona Vaccine : लस देण्यासाठी आणलेले नातेवाईक आणि संबंधित खेडकर नामक कर्मचाऱ्याने घातलेला गोंधळ हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Corona Vaccine : हद्द झाली ! आरोग्य कर्मचाऱ्याने नातेवाईकांना देण्यासाठी चोरून कोरोना लस आणली
- सोमनाथ खताळ
बीड : अहमदनगर जिल्ह्यातील एका आरोग्य कर्मचाऱ्याने आपल्या नातेवाईकांना देण्यासाठी चक्क आरोग्य केंद्रातील लस चोरुन आणल्याचे समोर आले आहे. ही लस आष्टी तालुक्यातील कडा आरोग्य केंद्रात देताना हा प्रकार उघड झाला. आता या आरोग्य कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकाराने मात्र लसीचा काळाबाजार कसा होत, हे उघड झाले आहे.
विठ्ठल खेडकर हे आरोग्य कर्मचारी कर्जत तालुक्यातील चापडगाव आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. शनिवारी त्यांनी लसची एक बॉटल चोरून कडा आरोग्य केंद्रात आले. येथे आपल्या सहा नातेवाईकांना लस देण्यास सांगितले. परंतु हा प्रकार गंभीर असल्याने कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना सांगितला. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार यांना सांगितला. यावर त्यांनी तात्काळ या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, लस देण्यासाठी आणलेले नातेवाईक आणि संबंधित खेडकर नामक कर्मचाऱ्याने घातलेला गोंधळ हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यानिमित्ताने आरोग्य कर्मचरायांकडून होत असलेला गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. आता या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
नगरचे जिल्हाधिकारी म्हणाले, डिएचओशी बोला
या गंभीर प्रकाराबाबत अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना संपर्क केला. यावर त्यांनी ही बाब जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी बोला म्हणत फोन डॉ. सांगळे यांच्याकडे दिला. ते म्हणाले, ही बाब गंभीर आहे. याची लगेच चौकशी करतो. हे जर खरं असेल तर तात्काळ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मी पालकमंत्री यांच्या बैठकीत आहे, नंतर सविस्तर बोलतो, असे म्हणत फोन ठेवला.
पाठीशी घातले जाणार नाही
कडा आरोग्य केंद्रातिल प्रकार समजला आहे. ही बाब गंभीर असून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. असे कोणी चूक करत असेल तर त्याला पाठीशी घातले जाणार नाही.
- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड