बीड : जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या पाचपटीने वाढली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साडेतीन हजार चाचण्या झाल्या होत्या तर मार्च महिन्यात चालू आठवड्यात तब्बल १६ हजार चाचण्या झाल्या आहेत. पॉझिटिव्हिटी रेटही ५.५४ वरुन ११.११वर गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात जुलै २०२०पासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. सप्टेंबर महिन्यात तर या संख्येने उच्चांक गाठला होता. त्यानंतर हळुहळू चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्याही घटू लागली. आता चालू वर्षात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३ हजार ४९४ चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात १९९ रुग्ण बाधित आढळले होते. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग पाहता, चाचण्या वाढविण्यास सुरुवात झाली. मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात ६ हजार ८२० चाचण्या झाल्या होत्या तर दुसऱ्या आठवड्यात १६ हजार ७०९ चाचण्या झाल्या आहेत. दरम्यान, चाचण्या वाढल्याने रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. पॉझिटिव्हिटी रेटही दुप्पट वाढल्याचे दिसत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
कोट
कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करुन चाचण्या केल्या जात आहेत, तरीही काही लोक आजही चाचणी करण्यास पुढे येत नाहीत. नागरिकांनी स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी चाचणी करून घ्यावी. पॉझिटिव्ह असल्यास तत्काळ उपचार करता येतील. पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याने चिंता वाढली आहे.
- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
अशी आहे आकडेवारी
आठवडाएकूण चाचणीबाधित नमुने पॉझिटिव्हिटी रेट
फेब्रुवारी पहिला ३,५९४ १९९ ५.५४
फेब्रुवारी दुसरा ३,०४८ १७० ५.५८
फेब्रुवारी तिसरा २,८९२ २७७ ९.५८
फेब्रुवारी चौथा ५,७३२ ४०० ६.९८
मार्च पहिला ६,८२० ६२७ ९.१९
मार्च दुसरा १६,७०९ १८५७ ११.११
एकूण ३८,७९५ ३,५३० ९.१०