रेल्वे प्रवाशांना कोरोना टेस्ट, लसीकरण प्रमाणपत्र सक्तीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:09+5:302021-07-08T04:23:09+5:30
संजय खाकरे/ लोकमत न्यूज नेटवर्क परळी : रेल्वेची संख्या आता बऱ्यापैकी वाढली आहे. मात्र, अनेक राज्यांत महाराष्ट्रातून आलेल्या व ...

रेल्वे प्रवाशांना कोरोना टेस्ट, लसीकरण प्रमाणपत्र सक्तीचे
संजय खाकरे/
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : रेल्वेची संख्या आता बऱ्यापैकी वाढली आहे. मात्र, अनेक राज्यांत महाराष्ट्रातून आलेल्या व बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना कोरोना टेस्ट, लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक आहे, असा संदेश रेल्वे प्रशासनाकडून येत असला तरीही त्याची अंमलबजावणी आंध्र प्रदेश, कर्नाटकात होत नसल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येते.
परळी मार्गे जाणाऱ्या औरंगाबाद-हैदराबाद या रेल्वेस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. त्याबरोबरच नांदेड-पनवेल या रेल्वेसही प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. परळीहून नांदेड-पनवेल पुन्हा सुरू झाल्याने परळीकरांची सोय झाली आहे. या दोन्ही रेल्वे गाड्यांत बुधवारी आरक्षण जागा उपलब्ध होती. पुणे-अमरावती रेल्वे कधी सुरू करणार? असा प्रश्न प्रवासीवर्गातून केला जात आहे. त्याबरोबरच परळीहून पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सध्या स्पेशल रेल्वे सुरू असून, पॅसेंजर रेल्वे गाड्या मात्र मार्च २०२० पासून बंदच आहेत. पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू झाल्यास सर्वसामान्य प्रवाशांची सोय होऊन ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांनाही तिकिटात सूट मिळते; परंतु सध्या पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू नसल्याने प्रवाशांनाही सूट मिळत नाही. प्रवास करताना जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत.
....
तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी इतर राज्यात आम्ही जाऊन आलो; परंतु कोरोना टेस्ट व लसीकरण प्रमाणपत्र कुठेही बंधनकारक केले नाही.
-एक रेल्वे प्रवासी, परळी.
....
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
नांदेड-पनवेल, काकीनाडा-शिर्डी, सिकंदराबाद-शिर्डी, विजयवाडा-शिर्डी, औरंगाबाद-हैदराबाद, बंगळुरू-नांदेड, कोल्हापूर -नागपूर, कोल्हापूर-धनबाद.
....
पॅसेंजर रेल्वे कधी सुरू होणार
आदिलाबाद-परळी, परळी-अकोला, निझामाबाद-पंढरपूर, परळी-मिरज, पूर्णा-परळी, पूर्णा-हैद्राबाद.
...
दुसऱ्या राज्यात प्रवेश करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना कोरोना टेस्ट व लसीकरण प्रमाणपत्र याविषयी रेल्वे प्रशासनाची नियमावली अद्याप आलेली नाही. याची चौकशी करून माहिती देण्यात येईल. पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाचा अद्याप आदेश आला नाही. जेव्हा आदेश येईल तेव्हा पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्यात येईल.
-जितेंद्रकुमार मीना, रेल्वे स्टेशन मास्तर, परळी.