कोरोनाचा परिणाम : हॉटेलिंग, प्रवास खर्च, पर्यटनाला लावली कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:36+5:302021-07-12T04:21:36+5:30
आर्थिक समस्यांनी ग्रासलेल्या कुटुंबांनी शोधला कॉस्टकटिंग चा पर्याय कोरोनाने शिकविली कॉस्टकटिंग : अनावश्यक खर्चाला दिला फाटा अंबाजोगाई : कोरोनाच्या ...

कोरोनाचा परिणाम : हॉटेलिंग, प्रवास खर्च, पर्यटनाला लावली कात्री
आर्थिक समस्यांनी ग्रासलेल्या कुटुंबांनी शोधला कॉस्टकटिंग चा पर्याय
कोरोनाने शिकविली कॉस्टकटिंग : अनावश्यक खर्चाला दिला फाटा
अंबाजोगाई : कोरोनाच्या प्रादुर्भावाने अनेक कुटुंब आज आर्थिक अडचणीबरोबरच आर्थिक समस्यांनी ग्रासले आहेत. लॉकडाऊनने सर्वत्र अर्थचक्र ठप्प झाले. तर अनेकांच्या रोजगार हिरावला गेला. अशा स्थितीत कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा? हा प्रश्न अनेकांना भेडसावू लागला. यातूनच कोरोनाने कॉस्टकटिंग, आर्थिक नियोजन आणि बचतही शिकविली. कोरोनाचा परिणाम अनेकांच्या मानसिकतेवर झाला आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. मार्च २०२० मध्ये कोरोनाचे संकट आल्यानंतर देशभरात लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे प्रत्येक घरातील आर्थिक गणित बिघडले. उत्पन्न कमी झाले अन् खर्च वाढला. अशा परिस्थितीत घर चालविण्याची जबाबदारी गृहिणींच्या खांद्यावर आली. वाढत्या महामागाईला तोंड देत घरखर्च कसा भागवायचा? याची चिंता समोर असताना गृहिणींनी आपल्या जीवनशैलीत बदल करून कॉस्टकटिंगचे धोरण राबविले. त्यामुळे काही प्रमाणात का होईना अनावश्यक खर्च टळून तो खर्च घरखर्चात उपयोगी पडू लागला. ही तारेवरची कसरत गृहिणींच्या वाट्याला आली.
कोरोनामुळे आलेली बेरोजगारीची वेळ, यातून निर्माण झालेल्या आर्थिक समस्या, यामुळे अनेक कुटुंबात कलहाची स्थिती निर्माण झाली. यातून काहींनी धडा घेत अनावश्यक खर्चाला कात्री लावली. हॉटेलिंग आणि प्रवासावरील खर्च प्राधान्याने बाजूला केला, तर अनेकांनी मुलांच्या कटिंगही घरातच केल्या. यातून कटिंग कशी करावी? हे कौशल्यही कोरोनाने शिकविले. कोरोनाचे जेवढे दुष्परिणाम आहेत तसे त्याचे काही फायदेही झाल्याचा अनुभव काही कुटुंबप्रमुखांनी बोलून दाखविला. पैसे बचतीचा मार्ग अवलंब केल्याशिवाय सध्या पर्याय नाही. काटकसर हाच कुटुंबासाठी आधार ठरला.
प्रतिक्रिया :
कडधान्याला प्राधान्य दिल्याने बचत
शहरातील कुटुंबांनी भाजीपाला महाग झाल्याने कडधान्याला प्राधान्य दिले. गृहिणींनी आहारात बदल केला. कधी भाजीपाला तर कधी डाळींवर भर दिला. शिवाय, घरात खाद्यपदार्थ बनविण्याला प्राधान्य दिल्याने बाहेरील पार्सलसेवाही बंद झाली असल्याने पैशाची बचत झाली आहे.
-प्रतिमा पांडे
शिक्षणावरील अवांतर खर्चाला लावली कात्री.
शाळा सुरू झाल्यानंतर होणारा खर्च मोठा असतो. मात्र, कोरोना काळात शैक्षणिक शुल्क वगळता इतर खर्च टाळता आला आहे. स्कूल बसला लागणाऱ्या पैशांची बचत झाली. शिवाय, सांस्कृतिक कार्यक्रमावर होणारा खर्चही बंद झाला.
- सतीश दहातोंडे
पर्यटनावर होणारा अनावश्यक खर्च टाळता आला
मार्च २०२०पासून प्रवास ठप्पच आहे. आता घरातच शाळा, कार्यालयीन कामे ऑनलाइन सुरू असल्याने प्रत्यक्ष प्रवास टाळता आला. शिवाय, हॉटेलिंगही बंद असल्याने हा खर्च टाळता आला आहे. कोरोनाने अनेक बाबतीत बचतच शिकविली आहे.
- वैजयंती टाकळकर
कुठे कुठे केली कॉस्टकटिंग
भाजीपाल्याला पर्याय डाळींचा दिल्याने झाली बचत.
आवश्यक वीज वापर आल्याने पैशाची झाली बचत.
मोबाईलमुळे इतर शैक्षणिक खर्च टाळता आला.
प्रवास टाळल्याने वर्षभरात झाली बचत.
कोरोनाच्या प्रादुर्भावाने अनेकांच्या जगण्यात बदल झाला आहे.
आहे त्या पैशात बचत, काटकसर करण्याशिवाय सध्याला पर्याय नाही. आरोग्य, शिक्षणावर बहुतांश कुटुंबांचा खर्च झाला आहे.
कोरोनानंतर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर बाजारात भाजीपालाही मिळत नव्हता. अशावेळी कडधान्याला प्राधान्य देण्यात आले. भाजीपालाही मोजकाच खरेदी करण्याकडे अनेकांचा कल आहे.
जे खायचं ते घरातच तयार करण्यावर भर दिला गेला. यातून पैशांची बचत झाली. शिवाय, आरोग्यही सांभाळता आले, अनावश्यक आणि चैनीवर होणाऱ्या खर्चाला कात्री लावण्यात आली.
110721\20210207_145713_14.jpg~110721\_mg_5811_14.jpg