व्यापारी, विक्रेत्यांची पुन्हा कोरोना तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:46 IST2021-02-26T04:46:29+5:302021-02-26T04:46:29+5:30
शिरूर कासार : ‘कोरोना’ महामारीचा पुन्हा नव्याने उद्रेक सुरू झाला असून, बाधितांचा आकडा वाढतोच आहे. नियंत्रण मिळवण्यासाठी आता ...

व्यापारी, विक्रेत्यांची पुन्हा कोरोना तपासणी
शिरूर कासार : ‘कोरोना’ महामारीचा पुन्हा नव्याने उद्रेक सुरू झाला असून, बाधितांचा आकडा वाढतोच आहे. नियंत्रण मिळवण्यासाठी आता शहरी व ग्रामीण भागातील सर्व स्तरातील व्यापाऱ्यांना कोरोना तपासणी बंधनकारक केली आहे. या तपासणीचा अहवाल नसल्यास दुकान बंद ठेवावे लागणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.
कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सामुदायिक जबाबदारी महत्त्वाची आहे. मध्यंतरी मंदावलेला कोरोना पुन्हा एकदा जोर धरतो आहे. त्यासाठी थोडा जरी त्रास जाणवला तरी किंवा तत्पूर्वी तपासणी करून घेणे गरजेचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सक्त सूचना दिलेल्या आहेत. या संक्रमणाचे माध्यम असलेली छोटी-मोठी दुकाने, हाॅटेल, टपरी वा अन्य सर्वच व्यापाऱ्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोरोना चाचणीनंतर तपासणी पत्रक देण्यात येणार आहेत. या तपासणी पत्रकाशिवाय दुकान चालू ठेवता येणार नसल्याने सर्व व्यापाऱ्यांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी केले आहे.
आज व्यापक बैठक
तहसीलदार श्रीराम बेंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी तसेच नगर पंचायतीचे मुख्याधिकारी किशोर सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापक बैठक शुक्रवारी होणार असून, त्यात कोरोना या प्रमुख विषयावर सविस्तर आढावा आणि नियोजन केले जाणार आहे.
इथे होणार तपासणी
दिनांक २५ ते २८ फेब्रुवारी - रायमोहा - ग्रामीण भागासाठी
दिनांक ०१ ते ०५ मार्च - शिरूर कासार - जिल्हा परिषद शाळा
शहरातील व्यापाऱ्यांची तपासणी जिल्हा परिषद शाळेत १ मार्च ते ५ मार्च रोजी तर ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांची तपासणी रायमोहा येथे २५ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. शहरी व्यापाऱ्यांची तपासणी शिरूरमध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले.