स्वारातीमधील कोरोना प्रतिबंधक लसीकरण थांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:33 IST2021-04-11T04:33:12+5:302021-04-11T04:33:12+5:30
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयांमधील लस संपल्या कारणाने लसीकरण तूर्तास रुग्णालय प्रशासनाकडून थांबवले गेले आहे. ...

स्वारातीमधील कोरोना प्रतिबंधक लसीकरण थांबले
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयांमधील लस संपल्या कारणाने लसीकरण तूर्तास रुग्णालय प्रशासनाकडून थांबवले गेले आहे. नव्याने लस उपलब्ध होईपर्यंत लसीकरणासाठी नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये लस उपलब्ध होईल, अशी शक्यता प्रशासनाकडून वर्तवली गेली आहे. लस उपलब्ध झाल्याबरोबर लसीकरण सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
एकीकडे कोरोना बाधित रुग्णांची संख्या अंबाजोगाई तालुक्यात दररोज शंभराहून अधिक दिसून येऊ लागली आहे. त्याचप्रमाणे राज्यभरात कोरोना बाधितांची संख्या भरमसाठ वाढली आहे. एकीकडे संख्या वाढत असली तरी लसीचा पुरवठा आवश्यक त्या प्रमाणात होत नसल्या कारणाने लसीकरणामध्ये व्यत्यय आला आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयामधून आतापर्यंत साडेबारा हजारांहून अधिक व्यक्तींना लस देण्यात आली आहे. नागरिकांचा समाधानकारक प्रतिसाद आहे. सुटीच्या दिवशीही लसीकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तूर्तास लस संपली असल्याने नागरिकांना आता लस घेण्यासाठी काही दिवस थांबावे लागणार आहे.
आरोग्य विभागाकडे लसींचा पुरवठा करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. लस पुरवठा झाल्यास तत्काळ लसीकरण सुरू होईल. डॉ.राकेश जाधव,
अधीक्षक, स्वा.रा.ती. रुग्णालय, अंबाजोगाई