कोरोना पावला ! आठवीपर्यंतचे ४ लाख ९४ हजार विद्यार्थी परीक्षाविनाच पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:35 IST2021-04-04T04:35:13+5:302021-04-04T04:35:13+5:30
बीड : राज्यातील करोना स्थिती पाहता यावर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न करता आणि ...

कोरोना पावला ! आठवीपर्यंतचे ४ लाख ९४ हजार विद्यार्थी परीक्षाविनाच पास
बीड : राज्यातील करोना स्थिती पाहता यावर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न करता आणि परीक्षा न घेता शिक्षण हक्क कायदा नुसार पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्यानंतर जिल्ह्यातील पालकांमधून संमिश्र सूर उमटला. एकीकडे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षा घ्यायला हव्या होत्या, तर दुसरीकडे कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे हा निर्णय योग्य असल्याचे मत पालक, तज्ज्ञांमधून व्यक्त झाले. शिक्षण विभागाने ऑनलाइन, ऑफलाइन, यू-ट्यूब, गुगल या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले. मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आणि ऑनलाइन शिक्षणासाठी पुरेशा प्रमाणात साधनांची उपलब्धता नसल्याने, विद्यार्थ्यांना शिकण्यात अडचणी आल्या. पहिली ते चौथीच्या शाळा मात्र वर्षभर सुरू करता आल्या नाही. पाचवी ते आठवीच्या शाळा काही ठिकाणी सुरू झाल्या, मात्र विद्यार्थी, शिक्षक कोरोनाबाधित आढळल्यानंतर प्रशासनाला शाळा बंद कराव्या लागल्या. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन यावर्षी ते होऊ शकले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे वाया गेल्याची भावना पालकांमध्ये होती. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची यंदाच्या वर्षी वर्गोन्नती करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. या निर्णयामुळे पालकांना, विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
------------
सध्या महाराष्ट्राची कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय योग्य आहे. कारण मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते. तसेच ऑनलाइन व ऑफलाइन अध्ययन व अध्यापन म्हणावे तसे झाले नाही. मग परीक्षेत विद्यार्थी लिहिणार तरी काय? म्हणूण सर्व दृष्टीने घेतलेला हा निर्णय योग्य आहे.
-शिवाजी परळकर, पालक, बीड
-------------
परीक्षा नाही होणार हा फारच दुर्दैवी निर्णय आहे. पण कोरोना सध्या ज्या पद्धतीने वाढतोय त्यावरून सरकारने घेतलेला निर्णय योग्यच वाटतो. आमच्या मुलांची अभ्यासाची तयारी यावेळी नाही झाली, तर पुढच्या वेळी करून घेता येईल. पण आधी हा रोग नाहीसा व्हायला पाहिजे.
- लक्ष्मीकांत बियाणी, पालक
----------
परीक्षा घ्यायला हवी होती. भले ही वर्षभर माझी मुलगी शाळेत गेली नाही. पण वर्गात बसून किमान परीक्षा कशी द्यावी लागते, हे तरी तिला थोड फार समजले असते. पुढच्या वर्षी शाळा नक्की भरेल आणि परीक्षा कशा नीट होतील याकडे सरकारने लक्ष द्यावे हीच अपेक्षा आहे. - बाळू यादव, पालक
-----------
कोरोनामुळे वर्षभर शाळा झाल्या नाही. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. पुढच्या वर्षी कोरोनाची परिस्थिती सुधारली तरमुले शिकतील.
- प्रा. सुशीला मोराळे, सामाजिक कार्यकर्त्या
ऑनलाइनच्या माध्यमातून जवळपास परीक्षा झाल्या असत्या तर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी ऑनलाइन अभ्यास घेतलेल्या परिश्रमाचे चीज झाले असते. परीक्षा रद्दचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणारा ठरेल. परंतु सद्य:परिस्थितीमध्ये हा निर्णय हा सर्वांसाठी हिताचा आहे. - महेश पारीख, मुख्याध्यापक
------------
जिल्ह्यातील सर्व शाळा - ३,६८६
विद्यार्थी संख्या
पहिली - ५२,४१५, दुसरी ५४,१०५, तिसरी ५०,४०२, चौथी ५१,९९५, पाचवी ५३,०२५, सहावी ५१,७४३, सातवी ५१,२२८, आठवी ४९,५४०
एकूण ४,९४,४५३